निर्विघ्न विसर्जनासाठी यंत्रणांची धावपळ

निर्विघ्न विसर्जनासाठी यंत्रणांची धावपळ

सातारा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी पालिका, पोलिस, राज्य विद्युत मंडळ युद्धपातळीवर मुख्य मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करू लागली आहे. कृत्रिम तळ्याची निर्मिती, विद्युत पुरवठा अखंडित सुरू राहण्यासाठी, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 

गणेशोत्सवाची सांगता यंदा येत्या रविवारी (ता.२३) आहे. साताऱ्यात पूर्वापार अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ‘श्री’चे विसर्जन करतात. यंदा विसर्जनासाठी बुधवार नाका येथे कृत्रिम तळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या तळ्यानजीक घरगुती तसेच मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करता यावे, यासाठी पायाड उभे करण्यात येत आहे. तसेच विद्युत यंत्रणा, जीवरक्षक, क्रेन आदी आवश्‍यक गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी विसर्जनाचा मार्ग हा पारंपरिक ठेवण्यात आला आहे. मुख्य मिरवणूक ही राजवाडा येथून तांदूळ आळीमार्गे मोती चौक, जांभळी चौक, देवी चौक, कमानी हौद मार्गे शेटे चौक, शनिवार चौक, सदाशिव पेठ, मोती चौक अशी राहील. तेथून सर्व मंडळे बुधवार नाका येथील कृत्रिम तळ्यात विसर्जनसाठी रवाना होतील. पालिकेने मोनार्क चौक ते पोवई नाका, गणपतराव तपासे मार्ग आदी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर मंडळांना विद्युत यंत्रणेचा अडथळा होऊ नये यासाठी राज्य विद्युत मंडळाचे सुमारे ४० कर्मचारी विविध भागातील खांबांवरील विद्युत वाहिन्या सुमारे १८ ते २० फुटांवर नेत आहेत. बुधवार पेठ तसेच बुधवार नाका येथे दोन नवे विद्युत खांब उभारण्यात येत आहेत. या खांबांवर रस्ता ओलांडणाऱ्या विद्युत वाहिन्या एका बाजूला करण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य मिरवणूक मार्गावरील विद्युत सेवा अखंडित राहील, असा विश्‍वास मंडळांतील पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. 

सर्व चौकांमध्ये बंदोबस्त 
पोलिसांकडूनदेखील मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व चौकांमध्ये बंदोबस्त ठेवला जाणार आहे. महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलिसदेखील टप्प्याटप्प्यावर असणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com