केंद्रप्रमुखांची 70 टक्के पदे परीक्षेद्वारे

राजेंद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली केंद्रप्रमुखांची 70 टक्के पदे यापुढे परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. त्यासाठी फेब्रुवारी 2017 मध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली केंद्रप्रमुखांची 70 टक्के पदे यापुढे परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. त्यासाठी फेब्रुवारी 2017 मध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.

राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा मोठ्या संख्येने आहेत. शाळांवर नियंत्रणासाठी राज्य शासनाने नोव्हेंबर 1994 मध्ये केंद्रप्रमुखांची पदे निर्माण केली. सभोवतालच्या दहा-बारा शाळा एकत्रित करून त्यातीलच एका शाळेची केंद्रशाळा म्हणून निवड केली व तेथे केंद्रप्रमुखाची पदे 1995 मध्ये भरली गेली. पदवीधर व बी. एड. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांमधून आजपर्यंत शंभर टक्के पदे पदोन्नतीने भरली आहेत. केंद्रातील शाळांवर नियंत्रण ठेवणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे, प्रशासकीय कामकाज पाहणे, शाळांना नियोजित व अचानक भेटी देणे ही केंद्रप्रमुखांची मुख्य कामे आहेत.

आजपर्यंत केंद्रप्रमुखाची पदे सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने भरली गेल्याने त्या पदांना योग्य न्याय मिळाला नसल्यानेच शासनाने आता ही पदे परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ 30 टक्के पदेच पदोन्नतीने भरली जाणार आहेत. निवृत्तीस आलेल्या शिक्षकांची निवड झाल्याने कामाचा फारसा उठाव होत नव्हता. यापुढे सरळसेवा परीक्षेद्वारे 40 टक्के व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे 30 टक्के पदे स्वतंत्ररित्या परीक्षा घेऊन भरली जाणार आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रम प्राथमिक शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त यांच्या सल्ल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना निश्‍चित करण्यास सांगितले आहे. तर निवड चाचणी परीक्षा घेण्याची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली आहे. जिल्हानिहाय केंद्रप्रमुख पदांची रिक्त संख्या तातडीने भागविली आहे. राज्यात 4860 केंद्रशाळा आहेत.

यापुढे परीक्षेद्वारे पदे भरली जाणार असल्याने केंद्रप्रमुखपदी पात्र व्यक्तीची निवड होईल. प्रशासन गतिमान होईल. शैक्षणिक कामाचा उठाव होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ताही उंचावेल. शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
- डॉ. जी. बी. कमळकर
केंद्रप्रमुख विषयावर पीएच.डी.प्राप्त गटशिक्षणाधिकारी

Web Title: center head teachers recruitment through exams