केंद्रस्तरावर दरमहा शिक्षण परिषद

सचिन निकम - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

दरमहा शिक्षण परिषद होणे शिक्षकांसाठी चांगली बाब आहे. यामध्ये ठराविक विषयावर शिक्षकांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यास मदत होणार आहे.

- अविनाश क्षीरसागर, शिक्षक

लेंगरे - सर्व शिक्षा अभियानांतर्गत गट संमेलनाचे केंद्र स्तरावर आयोजन केले जात होते. शासनाने याचा निधी बंद केल्याने ही गट संमेलन बंद झाली होती. यामुळे शिक्षकांच्यामधील समन्वय संपुष्टात आला होता. परंतु राज्य शासनाने नव्याने शिक्षण परिषद सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

यापूर्वी गटसंमेलनात केंद्रस्तरावरील सर्व शिक्षक एकत्र येऊन शैक्षणिक आदर्श पाठाचे सादरीकरण शिक्षकांकडून करण्यात येत होते. याचे नियोजन व आराखडा विद्या प्राधिकरण, पुणे यांच्याकडून केले जात होते. यामुळे शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण करणे शिक्षकांना उपयुक्त ठरत होते. शासनाने गटसंमेलन बंद केल्याने सर्व प्रकिया थांबली होती.

 

शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्वस्तरावर यंत्रणा कार्यरत करून शंभर टक्के मुले शिकण्याच्या उद्देशाने काम करण्यास सुरवात केली आहे. यासाठी जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर ही शिक्षण परिषद लाभदायक ठरणार आहे. यामध्ये प्रगत शाळा, डिजिटल शाळा, एबीएल शाळा, आयएसओ ९००१ अशा नामांकित शाळांमधील शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणधिकारी या मार्गदर्शन करणार आहेत. याच धर्तीवर केंद्रात दरमहा शिक्षण परिषद होणार आहे. यामध्ये शंभर टक्के शाळा प्रगत करण्यासाठी, शाळाबाह्य मुले विरहित शाळा यासाठी शिक्षक व मुख्यध्यापकांना नियोजन व उपाययोजना करून याबरोबर नियमित वाचन, स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. केंद्रांतर्गत सर्व शाळा शंभर टक्के प्रगत करण्यासाठी चर्चा, नियोजन, कृती आराखडा या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून तयार करून त्याप्रमाणे उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदेचा अहवाल जिल्ह्याला सादर करावा लागणार आहे.