आणि त्या चाफ्याला फुटली चैत्राची पालवी 

आणि त्या चाफ्याला फुटली चैत्राची पालवी 

कोल्हापूर - शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचं हे पंचगंगेच्या काठावरचं चाफ्याचं झाड. गेल्या मुसळधार पावसात मात्र तग धरू शकलं नाही. पाण्याच्या प्रवाहात माती वाहून गेल्याने मुळं उघडी झाली आणि एक दिवस या झाडाने मान टाकली. भलं मोठं हे झाड उन्मळून पडलं. बघणारे खूप हळहळले व हळहळ व्यक्त करून आपापल्या कामावर निघून गेले; पण हे पाच जण केवळ हळहळ व्यक्त करून थांबले नाहीत. त्यांनी ठरवलं हे झाड पुन्हा उभं करायचं आणि त्यांनी त्यासाठी जे काही करावे लागेल ते केलं. झाड उभं राहिलं पण पुन्हा मुळं धरेल का, ही शंका होती. पण ही शंका दूर झाली आणि चाफ्याच्या या झाडाला चैत्राची नवी पालवी फुटली. 

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या टोकाला असलेल्या चाफ्याच्या झाडाला या निमित्ताने पुनर्जन्म मिळाला आहे. यामुळे निसर्ग वाचवण्यासाठी झटणाऱ्या ज्ञातअज्ञात निसर्गप्रेमींनाही नवा उत्साह लाभला आहे. रस्तारुंदीकरणाच्या तडाख्यातून सुटलेले हे झाड साधारण 100 ते 125 वर्षांपूर्वीचे. या झाडाखाली महादेवाची दोन मंदिरे. या झाडाला फुलं एवढी, की मंदिरावर रोज फुलांचा सडा पडायचा. गेल्या वर्षी पाऊस खूप झाला आणि कसा कोण जाणे रस्त्यावरच्या पाण्याचा लोट या झाडाच्या मुळाखालीच सरकला. परिणामी झाडाची मुळे मातीपासून सुटी झाली आणि झाडाची ताकद कमी झाली. 

एक दिवस पहाटे हे झाड लबकत लबकत जमिनीला टेकले. या झाडाची अवस्था आर्किटेक्‍ट सचिन पाटील, सौ. शीतल, राजू लिंग्रस, सुनीता लिंग्रस व नितीन सासने यांनी पाहिली. त्यांनी ठरवलं हे झाड पुन्हा उभं करायचं. त्यांनी स्वतः क्रेन बोलावली. झाडाचे ओझे एवढे, की क्रेनचीच चाके उचलू लागली. मग त्यांनी फांद्या छाटल्या. महापालिकेची त्यासाठी मदत घेतली. नगरसेवक अफजल पिरजादे यांनी सहकार्य केले. 

मूळ जागेपासून थोड्या अंतरावर झाडासाठी नवा खड्डा काढला व एरवी पानाफुलांनी डवरलेले हे झाड केवळ भग्नावशेषाच्या अवस्थेत उभे केले आहे. झाड पुन्हा उभे केले खरे; पण ते पुन्हा फुलेल का, अशी शंका होती; मात्र दहा- पंधरा दिवसांपूर्वी या झाडाच्या शेंड्याजवळ कोवळी पालवी फुटली. आज ती बऱ्यापैकी बहरली. निष्पर्ण झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टवटवी दिसू लागली. चैत्राची पालवीच साक्षात अवतरली आणि या पाचही जणांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा झळकली. 

सर्वांनीच पुढे येण्याची गरज 
आता त्यांनी ठरवलंय, झाड नैसर्गिकरीत्या किंवा एखाद्या अपघाताने पडलेले असो ते उचलायचं. आपल्या परीने झेपेल तो खर्च करायचा आणि ते झाड नुसतं लावायचं नाही तर जगवायचं. त्यांना ऍड. विवेक घाटगे, ऍड. अभिजित कापसे यांच्या "हिंदी है हम...' या ग्रुपने मदत करायचं ठरवलं आहे. गावाकडून कसलाही निधी गोळा न करता पदरमोड करून ते सारं ते करणार आहेत. त्यांना तुमचीही मदत हवी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com