सांगलीत जयंतरावांपुढे आव्हान

सांगलीत जयंतरावांपुढे आव्हान

कॉंग्रेसने काढले उट्टे; पृथ्वीराज चव्हाण; पतंगरावांची खेळी यशस्वी
सांगली - पश्‍चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीसाठी स्थापनेपासून बालेकिल्ला राहिला. त्यामुळे या विभागाचे केंद्र असलेल्या सांगली-सातारा या दोन जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीचे आजवरचे प्रभुत्व कॉंग्रेसने या वेळी मोडीत काढले. मोहनराव कदम यांच्या विजयाने राज्यस्तरावर राष्ट्रवादीला शिंगावर घ्यायचे बळ कॉंग्रेसला मिळाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची यामागची खेळी फत्ते झाली असून, जिल्ह्यात पतंगराव कदम यांच्या राजकारणाला बळकटी मिळाली आहे.

सांगली-सातारा दोन्हींकडे जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे बळ निश्‍चितपणे होते. होते यासाठी की विधानसभा निवडणुकीच्या सत्तांतरानंतर भाजप-सेनेतील इन कमिंग प्रामुख्याने राष्ट्रवादीतूनच झाले होते. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील राष्ट्रवादीचे बळ कागदावर दिसत असले, तरी ते भाजप-सेनेच्या अंडरस्टॅंडिंगनेच होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढायचा निर्णय घेतला तरच राज्यातील सहाही जागांवर भाजप-सेनेच्या आव्हानाचा मुकाबला शक्‍य झाला असता. मात्र आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादी-भाजपने राज्यात अंतर्गत पातळीवर युतीचा निर्णय घेतला.

त्याचा उच्चार सांगलीत भाजप नेत्यांनी आपली उमेदवारी मागे घेताना राज्यपातळीवरील निर्णयाचा आधार घेऊन केला. सांगली-सातारा जिल्ह्यापुरते बोलायचे तर इथे कॉंग्रेसच्या अपक्षानेही राष्ट्रवादीला झुंजवले होते. मात्र, त्यावेळच्या सत्तेच्या बळावर राष्ट्रवादीने मात केली. बदललेले राज्यातील सत्ताकारण आणि समोर पतंगराव कदम यांच्यासारख्या मातब्बर नेत्याची ताकद पाहता राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. त्याची जाणीवही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला झाली होती.

मोहनराव कदम यांची उमेदवारी ही एका जुन्या जाणत्या कार्यकर्त्याची होती. याउलट राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांची उमेदवारी मात्र बाजारू राजकारणाची द्योतक ठरली, असे राजकीय जाणकार म्हणतात. श्री. गोरे यांना पक्षात प्रवेश करण्याआधी उमेदवारी जाहीर होणे, तो निर्णय राष्ट्रवादीतील मातब्बर नेत्यांच्या अपरोक्ष होणे इथूनच राष्ट्रवादीच्या विजयात अडथळे सुरू झाले. ही निवडणूक आर्थिक सामर्थ्याची होती हे खरेच; मात्र त्याच वेळी ही निवडणूक नेत्यांच्या दोन्ही जिल्ह्यांतील नेते-पक्षाच्या नेटवर्किंगचीही होती. या कसोटीवर कदम घराणे गोरे यांच्यापेक्षा निश्‍चितपणे सरस ठरले. मतदारसंघातील 570 मतदारांपर्यंत पोचून आवश्‍यक ती रसद पोचविण्याचे नेटवर्किंग आणि सामर्थ्य कॉंग्रेसकडे होते. राष्ट्रवादीला मात्र स्वतःच्या मतदारापलीकडे थेटपणे जाता आले नाही. श्री. गोरे यांना त्यांच्या सातारा जिल्ह्यातच विरोध झाला. या विरोधामुळे सातारा जिल्ह्याशी असलेल्या पूर्वापार नातेसंबंधांना बळकटी आणण्यात पतंगराव यशस्वी ठरले.

या निकालाने कॉंग्रेसला काय दिले असेल, तर राष्ट्रवादीला शिंगावर घेण्याचे धैर्य. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप-सेना हा उघड विरोधक आहे; मात्र त्यापेक्षा राष्ट्रवादी हा छुपा विरोधक आहे, अशी प्रारंभापासून भूमिका घेतली होती. बदललेल्या राजकीय ताकदीनुसार सांगली-सातारा मतदारसंघ कॉंग्रेसचा असल्याची जाहीर भूमिका त्यांनी घेतली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे आहे. मात्र विधान परिषदेत राष्ट्रवादीकडे सभापती आणि विरोधी पक्षनेतेपद आहे. ती हिरावून घेण्यासाठी कॉंग्रेसला स्वतंत्रपणे लढावे लागेल, ही त्यांची भूमिका होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यातील अवस्था या निकालाने आणखी दयनीय होणार आहे. विशेषतः जिल्ह्यातील नगरपालिका व जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे मनोधैर्य खच्चीकरण करणारा हा निकाल आहे. या निवडणुकीत जयंत पाटील तडफेने सक्रिय नसल्याची चर्चा प्रारंभापासून होती. ते इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पुरते गुंतले आहेत हे कारण आहे. मात्र त्याबरोबरच गोरे यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाने वरिष्ठ पातळीवर घेतल्याचे सांगून त्यांनी ही उमेदवारी आपल्या अपरोक्ष झाल्याचे सूचित केले होते.

मोहनराव ठरले अकरावे आमदार
रामचंद्र भावे (1952 ते 58), गणपतराव कोळी (58 ते 64), धुळाप्पाण्णा नवले (66 ते 72), वसंतदादा पाटील (72 ते 78), सय्यद फारुक पाशा (78 ते 84), राजाभाऊ जगदाळे (86 ते 92), विष्णूअण्णा पाटील (92 ते 2000), मदन पाटील (2000 ते 2004), विलासराव शिंदे (2004 ते 2010) प्रभाकर घार्गे (2010 ते 2016)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com