कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या समृद्धीला महत्त्व : चंद्रकांत पाटील

Chandrakat Patil
Chandrakat Patil

नेसरी : शेतीचे उत्पादन दुप्पट झाले, तरच देशाचे उत्पादन वाढेल. यामुळे शेतकरी सुखी होईल. कर्जमाफी हा उपाय नव्हे तर शेतकरी समृद्ध करण्याचा मानस भाजपचा आहे. शेतकरी स्वत: श्रीमंत झाला पाहिजे, यादृष्टीनेच शासनाचेच प्रयत्न सुरू आहेत, असे मत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. 

पंडीत दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त आयोजित महासंपर्क अभियानातंर्गत भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे जिल्हा संघटकमंत्री रवींद्र अनासपुरे अध्यक्षस्थानी होते. या वेळी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील भाजपचे नूतन जि.प. व पं.स. सदस्यांचा श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. आक्‍काताई साखरे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. बाबा देसाई, प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, प्रकाश शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. पाटील म्हणाले, ''दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाद्वारे सामान्यांच्या हिताचे काम केले. याच घटकांचा सर्वांगीण विकास करणे भाजपचे धोरण आहे. सत्कार सभारंभात हारतुऱ्यावर खर्च, वेळ वाया न घालवता जनतेशी संवाद करून शासनाच्या योजना समजावून सांगा. लहानांपासून वृद्धापर्यंतच्या कल्याणकारी योजना केंद्र व राज्य सरकारने आणल्या आहेत. या विभागातील उचंगी, आंबेओहोळ, कार्जिणेसह रखडलेले जिल्ह्यातील नऊ प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करू.'' 

संघटक बाबा देसाई म्हणाले, ''जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 10 पैकी 10 जागा जिंकेल. जनकल्याणाच्या योजना तळागळातील जनतेपर्यंत पोचवाव्यात.'' 

श्री. अनासपुरे यांनी शासनाच्या योजनांची माहिती देऊन पारदर्शक कामाद्वारे पक्षाची ताकद वाढवावी व विकासकामासाठी भाजप कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. तालुकाध्यक्ष ऍड. हेमंत कोलेकर यांनी प्रास्ताविक केले. आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी, जिल्हा परिषद सदस्या राणी खमलेट्‌टी, अनिता चौगुले, कलाप्पा भोगण, सुनीता रेडेकर, सभापती जयश्री तेली, उपसभापती बनश्री चौगुले, सभापती जगनाथ हुलजी, उपसभापती ऍड. अनंत कांबळे, मारुती राक्षे, संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, वसंतराव यमगेकर, बाबूराव पाटील, राजेंद्र तारळे, रमेश रेडेकर, महादेव साखरे, डॉ. अर्चना कोलेकर, एम. एल. पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश पताडे, विठ्‌ठल पाटील उपस्थित होते. संजय कालकुंद्रीकर यांनी सूत्रसंचालन केले. एम. डी. पाटील यांनी आभार मानले. दरम्यान, विविध पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांचा या वेळी सत्कार झाला. 

नाहीतर राजीनामा द्या... 
श्री. पाटील म्हणाले, ''लोकप्रतिनिधित्व हे समाजसेवेचे माध्यम आहे. त्या माध्यमातून लोककल्याणाचे काम करावे. लोकप्रतिनिधींचे प्रत्येक क्षण आणि कधीकधी खिशातील पैसा खर्च करून सर्वसामान्यांची कामे करण्याची अपेक्षा पक्षाची आहे. ज्यांना हे जमत नाही, त्यांनी आताच राजीनामा द्यावा. मिळालेले पद हे काटेरी आहे. तुम्हीसुद्धा कॉंग्रेससारखा भ्रष्टाचार केला तर कॉंग्रेस आणि भाजपामध्ये फरकच राहणार नाही. यामुळे पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पारदर्शक व्यवहार करावा.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com