जागे व्हा, विमा कंपन्यांच्या 'कॅशलेस'ची खात्री करा

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 25 एप्रिल 2017

काही बँका एजंटांचे काम करून सभासदांचा विमा उतरवित आहेत. त्यासाठी ठराविक रक्कम दरवर्षी बचत खात्यातून (सेव्हिंग अकाउंट) मधून कापून घेतली जाते; मात्र कंपन्यांकडून दिलेले वचन पाळले जात नसल्याचा कटू अनुभव एका लाभार्थ्याला आला आहे.

कोल्हापूर : विमा आहे, तुम्ही बिनधास्त आहात, असे अजिबात नाही. सावधान, खात्री करा तुम्हाला विमा कंपनीने दिलेल्या वचनांसाठी ते आजही कटिबद्ध आहेत काय? सध्या विमा कंपन्यांकडून आणि त्यांच्या एजंटांकडूनही भूलभुलैय्या केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आजच खात्री करा, तुमचा विमा आजच्या घडीला तुम्हाला काय काय देणार आहे? वचनाप्रमाणे ते 'कॅशलेस' सुविधा देणार आहेत की नाही? 

इन्शुरन्स (विमा) म्हणजे हक्काचे संरक्षण म्हणून पाहिले जाते. तुम्ही त्याचे लाभार्थी व्हावे यासाठी तुमच्याकडे येऊन गोड भाषेत, आपुलकीचे शब्द वापरून त्याचे महत्त्व पटवून दिले जाते. कॅशलेससह अन्य सुविधांचे गाजर दाखविले जाते. कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेसची सुविधा मिळणार, याची यादीही दिली जाते.

आपण त्यांच्या आहारी जातो आणि आपला विमा उतरवितो. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आणीबाणीच्या वेळी 'कॅशलेस' उपचार मिळणार आहेत, असे गृहीत धरून आपण बिनधास्त राहतो; पण सध्या तसे घडत नसल्याचा अनुभव काही लाभार्थींना आला आहे.

काही बँका एजंटांचे काम करून सभासदांचा विमा उतरवित आहेत. त्यासाठी ठराविक रक्कम दरवर्षी बचत खात्यातून (सेव्हिंग अकाउंट) मधून कापून घेतली जाते; मात्र कंपन्यांकडून दिलेले वचन पाळले जात नसल्याचा कटू अनुभव एका लाभार्थ्याला आला आहे. त्याचा हा अनुभव इतरांना शहाणे करण्यासाठी पुरेसा आहे. 

एका लाभार्थ्याने विश्‍वास म्हणून बँकेमार्फत विमा उतरविला. तेव्हा शहरातील मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. तो लाभार्थी जेव्हा उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा तेथे या कंपनीचा विमा आमच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले. लाभार्थ्याने हॉस्पिटल प्रशासनाला त्यांच्याकडील विम्याचे पत्र दाखविले, त्यांच्या हॉस्पिटलचा सहभाग असल्याचे माहिती पत्रकही दाखवले; मात्र त्यांनी 'कॅशलेस' व्यवहाराला नकार दिला. 

ज्या बँकेतून विमा उतरविला, ज्यांनी विमा उतरविण्यास भाग पाडले, त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला; पण तेथेही काहीच उपयोग झाला नाही. सर्व अटी-नियम पूर्ण असून, नियमित पॉलिसी हप्ता भरूनही कॅशलेस उपचार होऊ शकले नाहीत. नाइलाज म्हणून संबंधित लाभार्थ्याने विमा कंपनीकडून आपण पॉलिसीच घेतली नाही, असे समजून उपचार केले आणि हॉस्पिटलचे बिलही आदा केले. त्यांचा हा मन:स्ताप नक्कीच इतरांना मार्गदर्शन करणारा आणि पुन्हा पुन्हा विचार करायला लावणारा आहे. विमा पाहिजेच; पण त्याची खात्रीही पाहिजे हे विसरता कामा नये. 

काय काय केले... 
पॉलिसीवर नमूद असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता तो क्रमांकच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. ज्या बँकेने विमा कंपनीचा विमा गळ्यात मारला होता, त्या बँकेच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरून दूरध्वनी बाजूला काढून ठेवला. विमा कंपनीतील परराज्यातील मुख्य कार्यालयात संपर्क साधला, तेथूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 

अखेर काय झाले? 'कॅशलेस' म्हणून सांगून बँकेने (एजंट) आपली फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. विमा कंपनीवरील विश्‍वासच उडाला.