मुख्यमंत्री घेणार तपासाचा आढावा

मुख्यमंत्री घेणार तपासाचा आढावा

‘ते’ पोलिस बडतर्फ होणार?

कोल्हापूर - वारणानगर (ता. पन्हाळा) येथील कोट्यवधी रुपयांच्या रकमेवर पोलिसांनीच डल्ला मारला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने घेतली. त्यांनी तातडीने तपासाचा अहवाल मागविला आहे. 

त्यानुसार येथील अधिकारी या प्रकरणाचा अहवाल घेऊन तातडीने मुंबईला रवाना झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातून संशयित पोलिसांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील फ्लॅटमधील ९ कोटी १३ लाख रुपयांवर खुद्द सांगलीतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याचे तपासात पुढे आले. यातील संशयित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, रवींद्र पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह चोरटा मोहिद्दीन मुल्ला आणि प्रवीण सावंत या नऊ जणांवर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

खुद्द तपास अधिकाऱ्यांनीच हे कृत्य केल्यामुळे जनतेने कोणावर विश्‍वास ठेवायचा हा प्रश्‍न उपस्थित झाला. या प्रकरणात सापडलेल्या सात पोलिसांमुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली. या प्रकरणाचा तपास पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सीआयडीकडे वर्ग केला. गुरुवारी पुणे सीआयडी विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी दिवसभर शनिवार पेठ कार्यालयात संपूर्ण प्रकरणाची व त्याच्या झालेल्या तपासाची सर्व माहिती घेतली. त्यानंतर पुढील तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.

वारणानगरातील प्रकरणात सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांचा डल्ला पोलिसांनीच मारला; मात्र ही बाब सांगली अगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात पुढे आली नाही. फिर्यादी सरनोबत यांनी फ्लॅटमध्ये रोकड रक्कम मोठी असल्याची शंका विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास-नांगरे पाटील यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर तपासाची सूत्रे फिरली. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तपास करून पोलिसांचा या प्रकरणातील सहभाग उघड केला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने घेतली. त्यांनी तपास यंत्रणेला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीआयडीच्या तपास यंत्रणेने गुन्ह्याबाबत आणि तपासाबाबतच्या संपूर्ण माहितीचा अहवाल तयार केला. तो सादर करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.

दरम्यान, घटनेतील कलम ३११ अन्वये सातही संशयितांना बडतर्फ का करता येऊ नये? याबाबतची चाचपणी तपास यंत्रणेने सुरू केली आहे. नियमानुसार त्या सर्वांना म्हणणे न्यायालयात मांडण्याची संधी मिळू शकते.

घनवटांची बदलीची विनंती नाकारली

सांगली - वारणानगर येथे ९ कोटी १८ लाख रुपयांवर डल्ला मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांची विनंती बदली नाकारली गेली आहे. 

राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी काल (ता. २०) जाहीर झाली. त्यामध्ये घनवट यांची बदली नाकारली गेली आहे. सध्या गृह उपाधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या निरीक्षक सुवर्णा पत्की यांची रत्नागिरीला बदली करण्यात आली आहे.

गतवर्षी एलसीबीचे विभाजन करून घनवट यांना दुय्यम स्थान दिल्याबद्दल त्यांनी तत्कालीन अधीक्षक सुनील फुलारी यांच्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली होती. घनवट आजारी रजेवर गेल्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. 

फुलारी यांची बदली झाली. तसेच काही दिवसांनंतर घनवट गुंडाविरोधी पथकाकडे हजर झाले. पथकात काम करण्यात स्वारस्य नसल्यामुळे ते बदलीसाठी प्रयत्नशील होते. यंदा जिल्ह्याबाहेर बदलीसाठी घनवट यांनी विनंती केली होती. यादरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि ते पसार झाले आहेत. काल बदल्यांची यादी जाहीर केली गेली. त्यामध्ये घनवट यांची विनंती नाकारल्याचे स्पष्ट झाले.

संजयनगरचे पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, विश्रामबागचे निरीक्षक राजेंद्र मोरे, गुप्तवार्ता विभागाचे निरीक्षक प्रताप पोमण, तुरची प्रशिक्षण केंद्राकडील निरीक्षक रमेश काटकर व शंकर कोरे यांचीही विनंती बदली नाकारली गेली आहे. निरीक्षक सुवर्णा पत्की यांची रत्नागिरीला बदली करण्यात आली. 

अन्य जिल्ह्यातून सांगलीत बदलून येणाऱ्यामध्ये निरीक्षक अप्पासाहेब कोळी (मुंबई शहर ते सांगली), राजन माने (नागपूर शहर-सांगली), रमेश भिंगारदेवे (लोहमार्ग पुणे-सांगली) राजू ताशिलदार (नांदेड-सांगली), अमृत देशमुख (कोल्हापूर- तुरची प्रशिक्षण केंद्र), पद्मावती कदम (एसीबी- तुरची), संभाजी सावंत (नानवीज- तुरची), संजय जाधव (लातूर प्रशिक्षण- सांगली) यांचा समावेश आहे. 

तुरची प्रशिक्षण केंद्रातून अन्यत्र बदली झालेल्यामध्ये सखाहरी गडदे (गुन्हे अन्वेषण विभाग), दत्तात्रय बोरिगिड्डे (उस्मानाबाद), उदय डुबल (कोल्हापूर), यशवंतराव केडगे (सोलापूर शहर) यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com