मुख्यमंत्र्यांनी दिल्या मंत्रालयातून पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

विजयकुमार सोनवणे 
मंगळवार, 3 एप्रिल 2018

सोलापूर शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उड्डाणपूल आणि ड्रेनेज योजनेचा विषय असलेली 31 मार्च रोजीची सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली. सभा तहकूब झाल्याने त्या विषयावर निर्णय झाले नाहीत.

सोलापूर - वर्षभरात तब्बल 10 ते 12 सभा तहकूब करण्याचा विक्रम करणाऱ्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्रालयातून संपर्क साधत, खबरदार... वारंवार सभा तहकूब कराल तर...अशा शब्दांत कानपिचक्या दिल्या. पक्षनेते संजय कोळी यांनी त्यास दुजोरा दिला, तर महापौर शोभा बनशेट्टी यांनी कुणाचाही फोन आला नसल्याचे सांगितले.

सोलापूर शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उड्डाणपूल आणि ड्रेनेज योजनेचा विषय असलेली 31 मार्च रोजीची सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली. सभा तहकूब झाल्याने त्या विषयावर निर्णय झाले नाहीत. परिणामी या योजना पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत. याबाबत सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली. त्यातच महापौरांनी आयुक्त मस्तवाल झाले असून, अहंकारी व हेकेखोरही आहेत, असा सनसनाटी आरोप केला. सभा तहकूब करून महापौर सभागृहाबाहेर गेल्यावर भाजपचे सदस्य सभागृहात आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना विकासकामापेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचे महत्त्व असल्याची चर्चा सुरु झाली. 

या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात महापालिकेतील काही जागरूक नगरसेवक आणि अधिकारी यशस्वी ठरले. वारंवार सभा तहकूब होत असल्याने विकासाचे निर्णय थांबले आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचा डिंगोरा विरोधकांकडून पिटला जात असताना भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी स्वतःहून पक्षाची प्रतिमा आणखीन मलीन होईल, असे निर्णय घेत आहेत, अशा प्रकारचा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पुराव्यासह पोचविण्यात आला. त्याची गांभीर्याने दखल घेत फडणवीस यांनी थेट या दोन पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला. सोलापुरच्या कडाक्याच्या उन्हाची काहीली दूर करण्यासाठी पालिकेतील वातानुकुलित कक्षात गारवा खात बसलेल्या पदाधिकार्यांना एसी तही घाम फुटला. मुख्यमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्याने त्यात आणखीन भरच पडली. त्यामुळे आतापर्यंत तहकूब झालेल्या सभा तातडीने बोलावून त्यावर निर्णय घेण्याचे तसेच अंदाजपत्रकीय सभाही घेण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात आले.

शहर विकासाचे प्रश्न प्रलंबित ठेवू नका. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असताना सभा तहकूब का होते. यापुढे असे होऊ नये. शहर विकासासंदर्भात 
कोणतेही विषय प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार लवकरच आम्ही अंमलबजावणी करीत आहोत, अशीू माहिती सभागृह नेता संजय कोळी यांनी दिली आहे. 

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis has told the office bearers