शहरात धावणार साडेसहा हजार रिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

चिखली - रिक्षा परवाना खुला करण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परवान्यासाठी सुमारे २९०० अर्ज आले आहेत. अर्जाची छाननी करून आजपर्यंत एक हजार ७२७ इरादापत्रांचे वाटप करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पूर्वीच्या सुमारे पावणेपाच हजार आणि नव्याने इरादापत्र दिलेल्या अशा एकूण सुमारे साडेसहा हजार रिक्षा पिंपरी-चिंचवड शहरात धावतील. 

वीस वर्षांपूर्वी १९९७ मध्ये रिक्षा परवाना देणे बंद करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी ते लॉटरी पद्धतीने देण्यात आले. त्यानंतर एक जून २०१७ रोजी पात्र व्यक्तींसाठी रिक्षा परवाना खुला करण्यात आला. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले. याला रिक्षाचालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाकडे गेल्या चार महिन्यांत सुमारे २९०० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी सुमारे १७२७ पात्र रिक्षाचालकांना इरादापत्र देण्यात आले. तसेच इतर अर्जाची छाननी सुरू असून, इतर पात्र व्यक्तींना लवकरच इरादापत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.  

याबाबत रिक्षा पंचायतीचे अमीर शेख म्हणाले, ‘‘सरकारने रिक्षा परवाना खुला केल्यानंतर अनेक पात्र लोक रिक्षा परवाना मिळवीत आहेत. रोजगाराच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह आहे; परंतु एका कुटुंबात वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर पाच-पाच परवाने मिळाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. जादा परवाने मिळविलेल्या व्यक्ती रिक्षा भाड्याने देऊन व्यवसाय करतात. त्यामुळे रिक्षाची संख्या वाढून बजबजपुरी होणार आहे. रिक्षा उभ्या करण्यापासून इतर समस्यांचा सामना करावा लागेल. रिक्षा खरेदीसाठी सध्या महिना ते दीड महिन्याचा प्रतीक्षा काळ आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विचार करता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येणाऱ्या रिक्षांमुळे या व्यवसायात प्रचंड स्पर्धा वाढेल. त्यातच रिक्षाचालकांना ओला, उबेर यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे खरा गरजवंत रोजगारापासून वंचित राहील.’