मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांचा पासवर्ड

Child-Security
Child-Security

सोलापूरसह महानगरातील आई-वडिलांनी लढवली युक्ती
सोलापूर - मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या दडपणामुळे राज्यभरात अनामिक भयाचे सावट पसरले आहे. त्यावर उपाय म्हणून सोलापूर, मुंबईच्या पालकांनी ‘पासवर्ड’ची युक्ती शोधली आहे. हा ‘पासवर्ड’ आई-बाबा आणि मुलांनाच ठाऊक असतो.

धुळे जिल्ह्यातील राईनपाड्यात मंगळवेढ्यातील पाच जणांना मुलांचे अपहरण करणारी टोळी समजून ठार मारण्यात आल्यानंतर या घटनेची सामाजिक चिकित्सा केली जात आहे. मात्र, उपायांचा विचार अभावानेच होत असल्याचे आढळते. सोलापुरातील प्रा. मोहिनी पिटके यांनी यासंदर्भात ‘सकाळ’ला सांगितले की, समस्येचे उत्तर तिच्या व्यापक भयातूनच मिळालेले आहे. आई-बाबांनी आपल्या मुलांना विशिष्ट शब्द पासवर्ड म्हणून सांगितला तर असे प्रकार टळू शकतात. रिक्षावाले काका, अत्यंत जवळची व्यक्ती यांनाच तो सांगावा. महानगरांमध्ये मुलांना शाळेत सोडण्यासाठी रिक्षा असते. एखादवेळी रिक्षावाले काका आले नाहीत, तर त्यांच्याऐवजी दुसऱ्याच रिक्षात बसून मुले जाऊ शकतात. त्या वेळी पासवर्ड उपयोगी पडतो.

‘‘तुझ्या आईला अपघात झालाय, तातडीने घरातून पैसे घेऊन निघ’ किंवा गोड बोलून चॉकलेट खाऊ घालून रिक्षात बसवून मुलांना शाळेतून परस्पर पळवून नेण्याचे प्रकार सोलापुरात घडले आहेत. त्यादृष्टीने पालक जागरूक झाले आहेत. काहीवेळा ‘फियर ग्रुप’ तयार होतात. त्यातून भय घालवण्यासाठीसोशल मीडियाचा वापर व्हायला हवा, दुर्दैवाने तो भीती पसरवण्यासाठी होतो, असे ॲड. कुलकर्णी म्हणाल्या.

अपहरणासारखा प्रकार टाळण्यासाठी लोकांनी जागरूक राहणे गरजेचे असते. विशेषतः आई आणि वडील असे दोन्ही पालक जेव्हा नोकरीनिमित्त बाहेर असतात, त्या वेळी ‘पासवर्ड’सारखी खबरदारी उपयुक्त ठरते.
- प्रा. मोहिनी पिटके, पालक, सोलापूर

मी माझ्या मुलाला, सिद्धेशला पासवर्ड दिला आहे. कोणतीही अनोळखी व्यक्ती आपल्याबरोबर चल, असं म्हणाली तर त्यांना माझा मुलगा पासवर्ड विचारतो. त्यामुळे एकप्रकारची निश्‍चितता राहते. महानगरात सुरक्षिततेसाठी कल्पकताही दाखवावी लागते.
- ॲड. मुग्धा कुलकर्णी, पालक, मुंबई

अफवा त्सुनामीसारखी असते. ती जसजशी जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोचत जाते, तशी लोकांना खरी वाटायला लागते. चक्रवाढ व्याजासारखी ती फुगत जाते. लोकांचा तिच्यावरचा विश्‍वास वाढतो. त्यातून ‘मॉब सायकॉलॉजी’ तयार होते, ती हिंसेला कारणीभूत ठरते.
- डॉ. श्रीकांत पाटणकर, मानसोपचारतज्ज्ञ, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com