सर्किट बेंचच्या घोषणांनी दणाणले शहर

सर्किट बेंचच्या घोषणांनी दणाणले शहर

कोल्हापूर - मोटारसायकल रॅलीत सहभागी झालेल्या वकील, पक्षकार, विविध पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांनी सर्किट बेंचच्या घोषणांनी शहर दणाणून सोडले. आठ दिवस पूर्वसूचना देऊनही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी कार्यालयात उपस्थित न राहिल्याबद्दल आंदोलकांसह जिल्हा बार असोसिएशनने त्यांचा निषेध नोंदवला. शिष्टमंडळातर्फे महापौर हसीना फरास यांनी मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. वर्ष अखेरपर्यंत शासनाला हा प्रश्‍न सोडविण्यास भाग पाडूच, असा निर्धार या वेळी आंदोलकांनी केला.

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू व्हावे, या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीने आज सहा जिल्ह्यांत मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. सकाळी दहा वाजल्यापासून न्याय संकुलात वकिलांसह पक्षकार, विविध पक्ष, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी जमा होऊ लागले. डोक्‍यावर टोपी, हातात वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे, गळ्यात स्कार्फ तर हातात खंडपीठ मागणीचे फलक होते. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास न्याय संकुलातून मोटारसायकल रॅलीला सुरवात झाली. रॅलीत सहभागी झालेल्या हजारो आंदोलकांनी ‘सर्किट बेंच आमच्या हक्काचं, वुई वाँट खंडपीठ...’च्या घोषणा देण्यास सुरवात केली. चौकाचौकातून सहभागी होणाऱ्या नागरिकांमुळे रॅलीची व्याप्ती वाढत गेली. पोलिस अधीक्षक कार्यालयापासून रॅली ताराराणी चौक, स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, सावित्रीबाई हॉस्पिटल, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोर्डिंग, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, सीपीआर चौक, दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागाळा पार्क रस्त्यासमोरील प्रवेशद्वारही पोलिसांनी बंद केले होते. मात्र वकिलांसह काही आंदोलक महावीर गार्डनसमोरील प्रवेशद्वारातून आत घुसले. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना रोखले. फक्त शिष्टमंडळाला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी नसल्याचे आंदोलकांना समजले. ते कार्यालयीन कामासाठी इचलकरंजीला गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. याबाबत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. प्रकाश मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आठ दिवस पूर्व लेखी सूचना देऊनही ते कार्यालयात गैरहजर आहेत.  त्याबद्दल त्यांचा निषेध नोंदवला. एक सामाजिक प्रश्‍न घेऊन वकिलांसबोत विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले आहेत. त्यात महापौरही आहेत. शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अर्थात त्यांच्या रूपाने संपूर्ण शहर येथे आले आहे. मात्र त्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी येथे नाहीत. येथून पुढे तरी त्यांनी सामाजिक प्रश्‍नाबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली.

शिष्टमंडळातर्फे महापौर हसीना फरास यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सर्किट बेंचबाबत निवेदन दिले. याप्रसंगी महापौर फरास म्हणाल्या, ‘‘वकिलांच्या लढ्याला सर्व पक्ष संघटनांचाच नव्हे तर तमाम जनतेचा पाठिंबा आहे. हा लढा यशस्वी करणे हेच आमचे ध्येय आहे.’’

निवास साळोखे म्हणाले, ‘‘सर्किट बेंचबाबत तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी सकारात्मक अहवाल दिला होता. त्याचा संदर्भ घेऊन जिल्हा प्रशासनाने तो शासनाकडे पाठवावा. आता हा लढा निर्णायक पातळीवर येऊन ठेपला आहे. डिसेंबर २०१७ अखेर हा प्रश्‍न शासनाला कोणत्याही परिस्थितीत सोडवायला भाग पाडूच.’’

माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे म्हणाले, ‘‘सहा जिल्ह्यांतील तमाम नागरिकांच्या भावना निवेदनाद्वारे राज्य शासनापर्यंत जिल्हा प्रशासनाने पोहचवाव्यात.’’

ॲड. विवेक घाटगे म्हणाले, ‘‘सामाजिक प्रश्‍नाबाबत महापौरांसह तमाम जनता येथे आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची अनुपस्थिती पुनरावृत्ती पुन्हा घडू नये.’’

 भाजपचे महेश जाधव यांनी आचारसंहिता संपल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणून हा प्रश्‍न मार्गी लावू, असे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी सर्किट बेंचबाबतच्या तमाम नागरिकांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू, असे आश्‍वासन दिले.

आंदोलनात माजी महापौर आर. के. पोवार, अभिनेते विजय पाटकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, दिलीप देसाई, नामदेव गावडे, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक अजित राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, अनिल घाटगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंत मुळीक, अवधूत पाटील, मनसेचे राजू जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अशोक देसाई, सुरेश जरग, विवेक कोरडे, अशोक पोवार, कमलाकर जगदाळे, प्रसाद जाधव, बाबा पार्टे, सुभाष जाधव, विजय पाटील, हेमंत डिसले, भाऊ घोगळे, बाबा इंदुलकर, संभाजी देवणे, चंद्रकांत यादव, शिवसेनेचे किशोर घाटगे, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, उदय लाड, बाजीराव नाईक, सुरेश कुऱ्हाडे, जहिदा मुजावर, वैशाली महाडिक, अशोक भंडारे, पद्माकर कापसे, रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, शहराध्यक्ष अनिल सरक, महादेव डावरे, आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले, एस. पी. साळवी, लाला गायकवाड, यांच्यासह ॲड. महादेवराव आडगुळे, उपाध्यक्ष ॲड. अरुण पाटील, सचिव ॲड. सर्जेराव खोत, ॲड. राजेंद्र किंकर, ॲड. राजेंद्र मंडलिक, ॲड. संपत पवार, माजी अध्यक्ष ॲड. अजित मोहिते, ॲड. राजेंद्र मंडलिक आदी सहभागी झाले होते.

रॅलीत विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महावीर, न्यू लॉ, सायबर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. इतकेच नव्हे तर पहिल्यांदा तृतीयपंथीयांनीही या रॅलीत सहभागी होऊन सर्किट बेंचचा नारा दिला.

गडहिंग्लजला मोटारसायकल रॅली
गडहिंग्लज : कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी येथील गडहिंग्लज तालुका ॲडव्होकेटस्‌ बार असोसिएशनतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

कनिष्ठ स्तर न्यायालयापासून सकाळी अकराला रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली प्रांत कार्यालयासमोर आली. तेथे सभेत राष्ट्रवादीच्या संघटक डॉ. नंदिनी बाभूळकर, मनसेचे नागेश चौगुले, शिवसेनेचे दिलीप माने, भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, रामकुमार सावंत यांची भाषणे झाली. प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार पी. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com