शहराला देणार दिवसाआड पाणी

शहराला देणार दिवसाआड पाणी

पालकमंत्री देशमुख; ‘कॉफी विथ सकाळ’ मध्ये व्यक्त केला मनोदय

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकांनी भाजपवर विश्‍वास ठेवून चांगला कौल दिला आहे. त्यामुळे शहरात वास्तव्यास असलेल्या लोकांसाठी सर्वकाही करण्याची पक्षाची तयारी आहे. शहराचा विकास आराखडा तयार करून त्यादृष्टीने कामकाज करण्यावर आमचा भर असेल, असे मत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ‘कॉपी विथ सकाळ’मध्ये व्यक्त केले. 

एक दिवसाआड पाणी
महापालिकेची सत्ता आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आता वॉटर ऑडिट केले जाईल. त्यानंतर नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शहरात पाणी साठवण्यासाठी टाक्‍यांची कमतरता आहे. त्यामुळे टाक्‍या तयार करून प्रश्‍न निकाली काढण्यावर भर असेल.

मीडियातून गटबाजी
सहकारमंत्री सुभाष देशमुख व माझे मतदारसंघ वेगवेगळे आहेत. त्यामुळे गटबाजी करण्याचा संबंधच येत नाही. मात्र, आमच्यात गटबाजी असल्याचे मीडियातूनच पुढे येते. त्यामुळे आमच्यात गटबाजी वगैरे काही नाही.

८० टक्के युवकांना संधी
यंदाच्या महापालिका निवडणुकीत ८० टक्के युवकांना संधी दिली आहे. यापूर्वी ज्येष्ठांचा पक्ष म्हणून आमच्याकडे पाहिले जात होते. मात्र, यंदा काही ज्येष्ठांना घरी बसविले आहे. तरुण चेहऱ्यांना संधी दिल्याने सध्या तरुणांचा पक्ष अशी आमची ओळख झाली आहे. कार्यकर्त्यांचा पाया मजबूत असल्याने महापालिकेतील विजय शक्‍य झाला आहे.

नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजांचीही संख्या जास्तच होती. मात्र, जे नाराज झाले त्यांची घरी जाऊन समजूत काढली आहे. त्यातूनही रिंगणात असणाऱ्यांना मतदारांनी नाकारले आहे. भविष्यातही नाराजांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाईल.

काळेंसाठी खूप प्रयत्न केले
नरेंद्र काळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी खूप प्रयत्न केले. पण, ते ज्या ठिकाणी निवडणुकीला उभारणार होते तो भाग सहकारमंत्री देशमुख यांच्या मतदारसंघात येत होता. त्यामुळे त्यात मला हस्तक्षेप करता आला नाही. काळे यांना तिकीट न दिल्यास चार उमेदवार निवडून येतील, असे त्या वेळी सांगितले होते. त्याप्रमाणे निवडणुकीनंतर चित्र दिसले.

त्यागाचे फळ मिळेल
पक्षात ज्यांनी-ज्यांनी त्याग केला, त्या सर्वांना त्यागाचे फळ मिळेल. स्वीकृत सदस्यांची संख्या कमी असल्याने कुणाला संधी द्यायची यावर कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. ‘एमआयएम’चे उमेदवार विरोधात उभे केल्याने माजी महापौर आरिफ शेख पराभूत झाले. 

चार-आठ दिवसांतून एकदाच महापालिकेत
चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांना पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण ते शक्‍य झाले नाही. डॉक्‍टरकी महत्त्वाची आहे. त्यामुळे महापालिकेत चार-आठ दिवसांतून एकदा जाण्याचा सल्ला मी त्याला दिला आहे. 

कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय
महापौर कुणाला करायचे याबाबत अनेक नावे पुढे येत आहेत. मात्र, याबाबत कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतर ती नावे प्रदेशाला कळविली जातील. त्यानंतरच महापौरपदाचे नाव निश्‍चित होईल.

अंदाज चुकला
महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला ५० ते ५५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. त्यामध्ये थोडीशी घट झाल्याचे निकालानंतर कळले. मीडियाचाही अंदाज आम्हाला जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा कमीच होता.

जिल्हा परिषदेत लक्ष घालणार नाही
महापालिकेत सत्ता मिळेल. पण, जिल्हा परिषदेमध्येही त्रिशंकू स्थिती आहे. त्याकडे मी लक्ष घालणार नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख व जिल्ह्यातील पक्षाची इतर नेतेमंडळी त्यासाठी प्रयत्न करतील.

परिचारकांबाबत राजकारण
आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून मोठी चूक झाली आहे. त्या चुकीबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. मात्र, याबाबत सुरू केलेले राजकारण थांबविण्याची गरज आहे.

महेश कोठेंचे भाजपमध्ये स्वागत
शिवसेनेचे महेश कोठे जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच केले जाईल. महापौरपदासाठी आम्ही कुणाला पाठिंबा मागायला जाणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com