सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

इतिहासाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर यांच्या संग्रहातील जुन्या महसुली दस्ताऐवजाचे हे प्रदर्शन उद्‌घाटन समारंभाचे आकर्षण ठरले.

सांगली :  सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे साकारलेल्या भव्य जिल्हाधिकारी कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तब्बल 21 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करून साकारलेल्या या कार्यालयामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे हे कार्यालय आहे. कॉंग्रेस आघाडी शासनाच्या कार्यकालात या कामाचा प्रारंभ झाला होता. गेली दोन वर्षे या इमारतीचे काम सुरू होते. भव्य अशा तीन मजली या इमारतीचे आज मुख्यमंत्र्याच्या धावत्या दौऱ्यात लोकार्पण झाले. 

सकाळी नियोजित वेळेआधी पंधरा मिनिटे म्हणजे दुपारी एक वाजता मुख्यमंत्री उद्‌घाटनस्थळी आले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री पतंगराव कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, अनिल बाबर,भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह नेत्यांचा ताफा होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन भरवलेल्या रंग महसुली या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.

इतिहासाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर यांच्या संग्रहातील जुन्या महसुली दस्ताऐवजाचे हे प्रदर्शन उद्‌घाटन समारंभाचे आकर्षण ठरले. मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटे या प्रदर्शनस्थळी व्यतीत केली. त्यात त्यांनी 1773च्या दस्ताऐवजाची माहिती श्री.कुमठेकर यांच्याकडून घेतली. देशातील असे पहिलेच प्रदर्शन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्य इमारतीत दर्शनी भागात कायमस्वरुपी हे प्रदर्शन भरवले जाणार असून त्यात महसुल विभागाला मार्गदर्शक ठरतील अशी जुनी कागदपत्रे मांडली जातील. महसुली अधिकाऱ्यांसाठी असे एखादे प्रशिक्षण शिबिर घ्यावे असेही त्यांनी सुचवले. 
 
असे आहे जिल्हाधिकारी कार्यालय 
रंगकाम नाही 
या इमारतीकडे पाहताच त्याची भव्यता लक्षात येते; मात्र उद्‌घाटन सोहळा तोंडावर आला तरी रंगकाम का केले नाही, असा सामान्य प्रश्‍न पडतो. वास्तविक, या इमारतीला बाहेरून रंग देण्याची आवश्‍यकताच नाही. बाहेरील बाजूने त्याला ऍग्रिगेट प्लास्टर वापरण्यात आले आहे. हे एक प्रकारचा रंगच आहे. 
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष आहे. तिथेपर्यंत जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी आकर्षक रस्ता बनवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहने थेट दुसऱ्या मजल्याच्या दारात जाऊ शकणार आहेत. 
तळमजला : स्टोअर रूम, रेकॉर्ड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल, आवक-जावक विभाग आणि कॅन्टिन. 
पहिला मजला : जिल्हाधिकारी कक्ष, बैठक कक्ष, स्वीय सहायक कक्ष, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विश्रांती कक्ष, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी कक्ष, करमणूक विभाग, रोहयो विभाग आणि नियोजन विभाग. 
दुसरा मजला : अप्पर जिल्हाधिकारी कक्ष, त्यांचे कोर्ट रूम, जिल्हा नियोजन बैठक हॉल, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कक्ष. 
पार्किंग : तळमजल्यावर कर्मचारी, अधिकारी.

Web Title: cm fadnavis inaugurates sangli collector office