पवारांचा सल्ला "समजनेवालों'को इशारा! 

पवारांचा सल्ला "समजनेवालों'को इशारा! 

सातारा -  राष्ट्रवादीचे आमदार व खासदारांमधील संघर्ष टिपेला पोचल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बालेकिल्ला उद्‌ध्वस्त करण्याची स्वप्ने भारतीय जनता पक्ष पाहत असताना जिल्ह्यातील हे चित्र पक्षासाठी नक्कीच चांगले नाही. देश आणि राज्य पातळीवरील वातावरणाची नस जाणणाऱ्या शरद पवारांनी त्यामुळेच खासदार उदयनराजेंना दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला दिला. तो आमदार व खासदार दोन्हींसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. पवारांच्या सांगण्यानुसार दृष्टिकोन बदलता येईलही; पण त्यासाठी दृष्टी असायला तर हवी. 

उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादी हे जिल्ह्याचे चित्र नवे नाही. त्यांना पहिल्यांदा पक्षाचे तिकीट दिले गेले, तेव्हाही कोणत्याच आमदाराचा पूर्ण पाठिंबा नव्हता. उलट एका विद्यमान आमदाराला उदयनराजेंच्या आग्रहावरून पक्षाध्यक्षांनी डावलले होते. पक्षासाठी त्या-त्या परिस्थितीत योग्य असेल, असा निर्णय शरद पवारांनी घेतला. उदयनराजेंचे ऐकलेही आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला पाडलेही. त्यामुळे उदयनराजे काय बोलतात, कसे वागतात, कोणत्या-कोणत्या ठिकाणी आमदारांच्या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतली, याची पूर्ण माहिती त्यांना आहेच. त्यामुळे काल बारामतीच्या बैठकीत आमदारांनी काय वेगळे सांगितले असेल असे नाही. आमदार व खासदारांमध्ये असलेला हा दुरावा सातारा पालिकेच्या निवडणुकीनंतर जास्त ताणला गेला आहे. विधान परिषद सभापती व शिवेंद्रसिंहराजेंच्या ठाम भूमिकेमुळे आमदारांची मोट बांधली गेली. त्यामुळे विरोधाला अधिक धार आली आहे. 

वास्तविक वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी घडलेल्या बहिष्कार नाट्यावरूनच उदयनराजेंना वाऱ्याची दिशा समजायला पाहिजे होती. त्यानुसार तेव्हापासूनच त्यांच्या आजवरच्या भूमिका व कार्यपद्धतीबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी आपला नेहमीचाच कार्यक्रम राबवायला सुरवात केली. फलटण, कोरेगाव व कऱ्हाड वाऱ्या केल्या. त्यातून आगीत तेल ओतण्याचेच प्रकार झाले. त्यानंतर विश्रामगृहावर रामराजेंबाबत प्रकार घडले. त्यामुळे पक्षांतर्गत वातावरण चांगलेच पेटलेले होते. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. परवा झालेल्या शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्यात त्यांनी विश्रामगृहात आमदारांना झाश्‍यात घेतले. सर्वांनाच अंगावर घेण्याच्या तयारीत असल्याचे उदयनराजेंना दाखवायचे होते. ती वेळ चुकल्याचे आमदारांनी तातडीने घेतलेल्या भूमिकेतून दिसून आले आहे. 

उदयनराजेंचा विजय आमदारांच्या जिवावर 
दबावतंत्र प्रत्येक वेळी उपयोगी पडते असे नाही. कोणतीही गोष्ट अती ताणली की तुटतेच, हे तितकेच सत्य आहे. उदयनराजेंच्या दोन्ही विजयांमध्ये केवळ त्यांच्या ताकदीचा विजय कधीच नव्हता. त्यात पक्षाच्या मतांचा सर्वांत मोठा वाटा होता. तो मिळाला आमदारांच्या जिवावर. भारतीय रिपब्लिकन पक्षाने साताऱ्याचे तिकीट घ्यावे आणि शिवसेनेने त्याला तयार व्हावे, या त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचा वाटा हा मताधिक्‍य वाढविण्यात उपयोगी ठरला एवढेच. अन्यथा कऱ्हाड, वाई, खंडाळ्यामधील काही पाठीराखे, कोरेगावातील नाराज आणि राष्ट्रवादीवर नाराज असणारे कॉंग्रेसी आणि सातारा शहर यांच्या जिवावर खासदारकी जिंकण्याची स्वप्ने कोणीही पाहू शकत नाही. प्रत्यक्षात येणे तर दूरच. त्यातच विकासकामात सापत्न भाव दाखविल्यावरून कऱ्हाडमध्ये नाराजी आहे. त्यामुळे तिथला उमेदवार चित्र बदलू शकतो, हे उदयनराजेंनाही माहीत आहे; अन्यथा आमदारांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी तातडीने काल सायंकाळीच शरद पवारांची भेट घेतलीच नसती. त्यामुळे पवारांच्या म्हणण्याप्रमाणे उदयनराजेंनाही दृष्टिकोन बदलावा लागणार आहे. तो कृतीतून दिसावा लागणार आहे. 

आमदारांनी लक्षात घ्यावे भाजपचे हत्यार 
आमदारांचे म्हणायचे तर, 2014 च्या व आताच्या जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीत आणि जनमाणसाच्या मानसिकतेत बराच बदल झालेला आहे. गावपातळीपर्यंत उभे केलेले संघटन, नाराजांची सुरू असलेली आयात आणि नेत्यांना दिली जात असलेली राजकीय व आर्थिक कुमक भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढवत आहे. 2014 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. सातारा तालुक्‍याचेच म्हणायचे तर, पालिकेत सहा नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी चांगली मते मिळाली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिथे भाजप आणि उदयनराजेंची युती झाली, तेथे राष्ट्रवादी बॅकफुटवर गेली. सर्वच जागांवर भाजप व उदयनराजेंची आघाडी असती तर सातारा पंचायत समितीचे चित्र वेगळे दिसले असते. उदयनराजेंना वगळल्यास अशीच परिस्थिती अन्य मतदारसंघांतही थोड्या-अधिक प्रमाणात होऊ शकते. बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची ठोस रणनीती याच हत्याराच्या जोरावर आखली जाऊ शकते. त्याचा काही विधानसभा मतदारसंघांवर नक्कीच परिणाम होणार, हे निश्‍चित. त्यामुळे पारंपरिक भूमिकांत अडकलेल्या आमदारांनाही आपला दृष्टिकोन बदलावा लागणार आहे. देश आणि राज्य पातळीवरील घडामोडी घडवायच्या, की बालेकिल्ल्यात अडकायचे, हे शरद पवारांनाही चांगलेच माहीत आहे. त्यामुळे उदयनराजेंबद्दल कोणाचीच तक्रार नाही, असे ते म्हणाले. "समजनेवालों'को हाच "इशारा' आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com