केसपेपर काढण्यापासूनच संघर्ष

केसपेपर काढण्यापासूनच संघर्ष

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, अनियमितता, औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ढासळलेले नियंत्रण... या सर्वांमुळे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुण्यालयाचा दर्जा ढासळतोय. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य रुग्णांची परवड सुरू आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या जीवन-मरणाशी निगडित असलेल्या जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा पंचनामा करणारी मालिका वाचकांसाठी आजपासून...

सातारा - रुग्णांना चांगली सेवा देण्यात एकेकाळी राज्यात आघाडीवर असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयालाच सलाईन लावण्याची वेळ आली आहे. केसपेपर काढण्यापासून सुरू झालेला रुग्णाच्या कुटुंबीयांचा संघर्ष रुग्णालयातून बाहेर पडेपर्यंत सुरूच असतो. सध्या रुग्णांना एक ना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

सार्वजनिक आरोग्याचा दर्जा सुधारावा, यासाठी केंद्र शासनाने कायाकल्प योजना कार्यान्वित केली होती. सुरवातीला यामध्ये राज्यांतर्गत जिल्हा रुग्णालयांची स्पर्धा झाली. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सुविधांचा दर्जा, नियमितता, स्वच्छता अशा विविध विषयांनुसार रुग्णालयांना गुणांकन देण्यात येणार होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा विडा उचलला. चांगल्या पद्धतीने काम केले.

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावला. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आला. संपूर्ण जिल्ह्याला व सर्वसामान्य रुग्णांना सुखावणारी त्याचबरोबर अभिमानाची अशी ही बाब होती. मात्र, अधिकारी बदलले आणि रुग्णालयाचा कारभारही बदलू लागला. अधिकाऱ्यांना कामाचा आवाका यायला काही दिवस लागतील, असे सुरवातीला वाटले होते. मात्र, रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. गंभीर रुग्णांना ‘ससून’ची वाट दाखवली जात आहे.

आता रुग्णाला कुठे पाठविणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. केसपेपर विभागापासूनच रुग्णांना झगडावे लागत आहे. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात, असले तरी औषधे नसतात, शस्त्रक्रियांसाठी महिना-महिना वाट पाहावी लागते, अशी बाह्यरुग्ण विभागाची अवस्था आहे. आयुष विभागाच्या औषध उपलब्धतेकडेही लक्ष दिले जात नाही. रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिसत नाही. अपघातातील जखमी तसेच अन्य गंभीर रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळत नाहीत. सिटी स्कॅन मशिनचा प्रश्‍न सुटलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सर्वांमध्येच कामाच्या पातळीवर निरुत्साहाचे वातावरण आहे. अशा अनेक प्रश्‍नांनी जिल्हा रुग्णालयाला घेरले आहे. अशा स्थितीत वरिष्ठ अधिकारी एकमेकांकडे बोट दाखण्यात धन्यता मानत आहेत. चुकणाऱ्यावर कडक कारवाई होत नाही. काम करणाऱ्यावरच अधिक बोजा पडत आहे. प्रशासनाचे रुग्णालय व्यवस्थापनावरील नियंत्रण पूर्णत: हरविले आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. या सर्वांचा लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.

...ही आहे वस्तुस्थिती
वैद्यकीय अधिकारी नेहमी गैरहजर
सर्वच औषधांचा कायम तुटवडा
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
सिटी स्कॅनचा प्रश्‍न अद्याप प्रलंबितच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com