मिरजेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

महापालिका प्रभाग सभापती निवड - मिरजेत काँग्रेस बंडखोर

सांगली -महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती निवडीसाठी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादीची अपेक्षेप्रमाणे आघाडी झाली. प्रभाग एक व दोनच्या जागा वाटून घेण्यात आल्या असून प्रभाग तीनचा फैसला शनिवारी निवडीत घेतला जाण्याची शक्‍यता आहे. मिरजेतील प्रभाग चारमध्ये मात्र आघाडीत बिघाडी  निर्माण झाली असून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. शनिवारी या चारही प्रभाग सभापतींच्या निवडी जाहीर होतील. त्याची उत्सुकता लागली आहे.

महापालिका प्रभाग सभापती निवड - मिरजेत काँग्रेस बंडखोर

सांगली -महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती निवडीसाठी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादीची अपेक्षेप्रमाणे आघाडी झाली. प्रभाग एक व दोनच्या जागा वाटून घेण्यात आल्या असून प्रभाग तीनचा फैसला शनिवारी निवडीत घेतला जाण्याची शक्‍यता आहे. मिरजेतील प्रभाग चारमध्ये मात्र आघाडीत बिघाडी  निर्माण झाली असून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. शनिवारी या चारही प्रभाग सभापतींच्या निवडी जाहीर होतील. त्याची उत्सुकता लागली आहे.

चार प्रभाग समिती सभापतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस होता. सकाळपासूनच इच्छुकांनी पालिकेत ठिय्या मारला.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज यांच्या चर्चेसाठी मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अंतिम बैठक झाली, त्याच ठिकाणी उमेदवारांची नावे निश्‍चित झाली. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या चर्चेतून नावावर शिक्कामोर्तब झाला. तत्पूर्वी काँग्रेसला प्रभाग  १, २ व ४ अशी तीन समित्या, तर राष्ट्रवादीला प्रभाग समिती दोन देण्याचे निश्‍चित झाले. प्रभाग एकसाठी काँग्रेसचे पांडुरंग भिसे व वंदना कदम यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीच्या अंजना कुंडले, तर स्वाभिमानीकडून अश्विनी खंडागळे यांनी उमेदवारी दिली. कुंडले यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याने खंडागळे यांना धोका निर्माण झाला आहे. प्रभाग तीनमध्ये अंतिम निर्णय न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून  गुलजार पेंढारी तर राष्ट्रवादीकडून स्नेहा औंधकर यांचे  अर्ज दाखल झाले. 

मिरजेतील प्रभाग चारच्या सभापतिपदावरून नाट्यमय घडामोडी घडल्या. या प्रभागावर गेली अनेक वर्षे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे वर्चस्व आहे. नायकवडी यांना विश्वासात न घेताच काँग्रेसकडून अश्विनी कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे  शिवाजी दुर्वे यांनीही स्वतंत्ररीत्या अर्ज दाखल करत बंडखोरी केली. तर राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला  सोडली असतानाही शुभांगी देवमाने यांनी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. येत्या शनिवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती सदस्यांच्या बैठकीत सभापतिपदाची निवड होईल.

उमेदवार असे
प्रभाग समिती एक - पांडुरंग भिसे, वंदना कदम (दोन्ही काँग्रेस)
प्रभाग दोन - अंजना कुंडले (राष्ट्रवादी), अश्विनी खंडागळे (स्वाभिमानी)
प्रभाग तीन - गुलजार पेंढारी (काँग्रेस), स्नेहा औंधकर (राष्ट्रवादी)
प्रभाग चार - अश्विनी कांबळे, शिवाजी दुर्वे (काँग्रेस), शुभांगी देवमाने (राष्ट्रवादी)

सभापती निवडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने एकापेक्षा जादा अर्ज भरलेत. अर्ज  माघारीवेळी चर्चा करून उमेदवार अंतिम केला जाईल.  या निवडी बिनविरोधच होतील. तीन समितीमध्ये काँग्रेस उमेदवार आहेत. मिरजेतील देवमाने हेही आमचेच उमेदवार आहेत.
- हारूण शिकलगार, महापौर

Web Title: congress-ncp aghadi ddisturbance