सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे दिग्गज भाजपच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

महापालिका निवडणुकीसाठी ग्रामीण आणि जिल्हा कार्यकारिणी ताकदीने धडक मारणार आहे. सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरू. शहर जिल्हाध्यक्ष सुधीर गाडगीळ त्यासाठी रणनीती करत आहेत. त्यांच्या पाठीशी ग्रामीणचीही ताकद देऊ.

सांगली : भाजपने गेल्या काही काळात जिल्ह्यात मोठी मुसंडी मारली आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे भाजपला मोठी संधी असल्याने पक्षात येण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज इच्छुक आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांना प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली. 

सांगलीत पत्रकारांशी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, "भाजपने नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकवल्यानंतर जिल्ह्यात भाजपमध्ये येण्यास अनेक दिग्गज इच्छुक आहेत. भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे. आमच्या सर्व नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढत असल्याने भाजपमध्ये येण्यास मोठ्या संख्येने नेते इच्छुक आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीवेळीच काही जण येण्यास तयार होते.'' 

ते म्हणाले, "महापालिका निवडणुकीसाठी ग्रामीण आणि जिल्हा कार्यकारिणी ताकदीने धडक मारणार आहे. सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरू. शहर जिल्हाध्यक्ष सुधीर गाडगीळ त्यासाठी रणनीती करत आहेत. त्यांच्या पाठीशी ग्रामीणचीही ताकद देऊ.'' 

जिल्ह्यातील सिंचन योजनांचे वीजबिल थकीत आहे. तरीही योजनांचे पाणी सुरू आहे. योजनांचे बिल भरावे लागेल. त्यासाठी भाजप शेतकऱ्यांना बिल भरण्यासाठी प्रबोधन करणार आहे. वीज बिलासाठी जनजागृती हे भाजपचे मिशन असणार आहे. पावसाळ्यात हे मिशन सुरू होईल, असे पृथ्वीराज देशमुख म्हणाले. 

पाणी सोडूनही टॅंकर का सुरू, या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, "पाणी पोहोचविण्यासाठी वितरिकांचे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण झाली की योजनांचे पाणी जनतेला मिळेल आणि टॅंकर कायमचा बंद होईल.''

Web Title: Congress, NCP leaders in Sangli likely to join BJP