घडामोडींवर उलगडते यशापयशाचे कोडे!

घडामोडींवर उलगडते यशापयशाचे कोडे!

सातारा - वाठार (किरोली) गटावर आजवर कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य कायम तुल्यबळ राहिले आहे. दोन्ही पक्षांतील दिग्गजांनी पंचायत समितीमध्ये उपसभापती, जिल्हा परिषदेमध्ये कृषी, महिला आणि बालकल्याण, सह्याद्री साखर कारखान्यात संचालकपदापासून अगदी आता उपाध्यक्षपदावर काम केलेले वा करत असल्याने हा गट विकासाच्या बाबतीत कायम आघाडीवर राहिला आहे. निवडणूकपूर्व आणि प्रत्यक्ष निवडणूक काळात घडणाऱ्या राजकीय उलथापालथी, पक्ष, गट-तटातील नाराजी, मनोमीलन यावर गटातील यशापयशाचे गणित उलगडत आले आहे. या निवडणुकीतही तीच स्थिती दिसून येते.

वाठार म्हटले की गेली 30 ते 35 वर्षे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांचे नाव घेतले जाते. त्यांच्याबरोबरीने "सह्याद्री'चे संचालक संभाजीराव गायकवाड यांचे नाव पुढे येते. भीमराव पाटील यांच्याअगोदर वाठारमधून पांडुरंग गायकवाड (बुवा) यांनी पंचायत समितीत प्रतिनिधित्व केले. मात्र, उपसभापतिपदाचा मान मिळाल्यानंतर भीमराव पाटील यांनी खऱ्या अर्थाने या गटात विकासाची गंगा पोचवली. जिल्हा परिषदेत कृषी सभापतिपदी यशस्वी काम करून त्यांनी विकासाची घोडदौड कायम ठेवली. त्यानंतर या गटात आरक्षण आल्यावर राष्ट्रवादीच्या संभाजीराव गायकवाड यांच्या पत्नी लक्ष्मी गायकवाड यांनी निवडून जाऊन महिला व बालकल्याण सभापतिपदी यशस्वी काम करून विकासाला अधिक गती दिली. त्यांची "टर्म' पूर्ण झाल्यावर जनतेने पुन्हा एकदा भीमराव पाटील यांना जिल्हा परिषदेवर पाठवले. राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्या कविता गिरी यांनीही गटातील विकासाचा झंजावात कायम ठेवला. याच गटातील "राष्ट्रवादी'चे पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतिलाल पाटील यांची त्यांना मोलाची साथ लाभली. या काळात नागझरीचे माजी सरपंच जितेंद्र भोसले यांच्या पत्नी प्रतिभा भोसले यांनी कॉंग्रेसच्या वतीने गटातील नागझरी गणाचे प्रतिनिधित्व करत विकासाचा ओघ वाढवला. त्यात त्यांना कॉंग्रेस पक्षासह पक्षनेत्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वाठार गट आता खुला झाला आहे. या जागेवर कॉंग्रेसकडून भीमराव पाटील, जितेंद्र भोसले, तर राष्ट्रवादीकडून संभाजीराव गायकवाड, कांतिलाल पाटील, कोरेगाव बाजार समितीचे माजी सभापती ऍड. अशोकराव पवार, काकासाहेब गायकवाड, भरत कदम, तर भाजपकडून बंडा पैलवान (साप) आदी नावे चर्चेत आहेत. पंचायत समितीचा वाठार गणही खुला झाला असून, त्यातून कॉंग्रेसकडून अण्णासाहेब निकम (तारगाव), प्रकाश जाधव (आर्वी), राजेंद्र नलवडे (नलवडेवाडी), तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब जाधव, रमेश पवार, रमेश जाधव, अधिक पवार (सर्व आर्वी), सुरेश उबाळे (मोहितेवाडी),
दिलीप मोरे (तारगाव), अप्पासाहेब मुळीक (मुळीकवाडी), भाजपतर्फे
योगेश जाधव (आर्वी), शिवसेनेकडून संतोष जाधव (आर्वी) आदी नावे चर्चेत आहेत. साप गण हा ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. कॉंग्रेसकडून मंदा शिंदे (सुर्ली), दीपाली अडसुळे (साप), न्हावीतून माधुरी वेल्हाळ, राष्ट्रवादीतून महेश शिंदे (सुर्ली) यांची पत्नी, अंभेरीतील गायकवाड, सापमधील अडसुळे, भाजपकडून सुहास पंडित (सुर्ली) यांची पत्नी आदी नावे चर्चेत आहेत.

वाठार गटातील गावे...

वाठार, आर्वी, नागझरी, कोंबडवाडी, मुळीकवाडी, साठेवाडी, तारगाव, मोहितेवाडी, काळोशी, रिकीबदारवाडी, दुर्गळवाडी, नलवडेवाडी, साप, वेळू, अपशिंगे, बेलेवाडी, अंभेरी, न्हावी, पवारवाडी, पिंपरी, सुर्ली, चोरगेवाडी, किरोली, टकले, बोरगाव, गुजरवाडी, नवलेवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com