इच्छुकांना ‘गॅसवर’ ठेवण्यात काँग्रेस यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांना गुरुवारी दिवसभर ‘गॅसवर’ ठेवण्यात काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी यशस्वी ठरले. यादी जाहीर न झाल्यामुळे रात्री नऊपर्यंत इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट करून शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. 

गेल्या १५ दिवसांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चा सुरू होती. पहिल्या बैठकीत फक्त चर्चा व चहापान झाले, दुसऱ्या बैठकीत चर्चा झाली, तिसऱ्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली, ९० टक्के जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात आले, उर्वरित जागांबाबत प्रदेश पातळीवर निर्णय होईल असे सांगण्यात आले. दरम्यान आघाडी करायची की नाही, याबाबत दोन्ही पक्षांतील ‘हायकमांड’मध्ये एकमत झाले नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आणि तशी घोषणाही केली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी काँग्रेसच्या बहुतांश इच्छुकांना व ज्यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे त्यांना श्रेष्ठींकडून मोबाईलवरून निरोप दिले गेले. त्यानुसार अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज पक्षाच्या उल्लेखासह दाखल केले. पुन्हा आघाडीची चर्चा सुरु झाल्याने स्वबळावर लढण्यासाठी तयारी केलेल्या काँग्रेस इच्छुकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले. त्यांनी सातत्याने सर्वांशी संपर्क साधण्यास सुरवात केला. अखेर रात्री उशीरा आघाडी तुटल्याचे श्री. खरटमल यांनी जाहीर केले आणि उमेदवारी निश्‍चित झालेल्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली.