पालिकेतील काँग्रेसची सत्ता खिळखिळी

पालिकेतील काँग्रेसची सत्ता खिळखिळी

सांगली - स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता हारगे यांची निवड झाल्याने काँग्रेसच्या पालिकेतील सत्तेला मुळासह हादरा बसला आहे. यानिमित्ताने महापालिका सांभाळायची म्हणजे काय असते याचा पहिला धडा नेत्या जयश्री पाटील आणि विश्‍वजित कदम यांना मिळाला आहे.

काँग्रेसमधील दुफळीचा राष्ट्रवादीने अचूक फायदा घेतला. काँग्रेसमधून नुकतेच निलंबित झालेल्या उपमहापौर गटाचे नेते शेखर माने मित्रपक्ष स्वाभिमानी आघाडीचे नेते गौतम पवार यांच्या मदतीने पालिकेतील सत्ताधाऱ्यांना जोरदार तडाखा दिला आहे. परिणामी उर्वरित काळात काँग्रेसची पालिकेतील सत्ता पार खिळखिळी होणार आहे. 

‘स्थायी’त १६ पैकी ९ सदस्यांचे काँग्रेसचे स्पष्ट बहुमत होते. सभापतिपद टिकवण्यासाठी राष्ट्रवादी अथवा स्वाभिमानीची कोणतीच गरज नव्हती. काँग्रेसला स्वतःचे सदस्य टिकवणे - पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षा जाणून घेऊन मार्ग काढणे एवढीच ती काय गरज होती; मात्र त्यातही काँग्रेसचे नेतृत्व आणि महापालिकेतील कारभारी कमी पडले. कारण दिलीप पाटील नकोत, अशी स्पष्ट भूमिका विश्‍वजित कदम यांच्यासमोर काँग्रेसच्या नऊपैकी सहा सदस्यांनी घेतली होती. नेत्या जयश्री पाटील यांनी शब्द पूर्ण करण्यासाठी यापूर्वी हारुण शिकलगार यांना महापौरपदाची संधी दिली तेव्हाही त्यांच्या विरोधातच नगरसेवकांची संख्या होती. त्या वेळी चालले तसेच आताही चालेल, अशी आशा बाळगणे भाबडेपणाचेच होते. उपमहापौर गटाच्या माध्यमातून महापालिकेत स्वतंत्रपणे राजकारण सुरू आहे याचे भान काँग्रेस नेतृत्वाला ठेवता आले नाही. त्याऐवजी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसशी गेल्या वर्ष-दीड वर्षापासून सुरू असलेल्या गुपचूप संबंधावरच काँग्रेसच्या कारभाऱ्यांनी अधिक भिस्त ठेवली व फसगत करून घेतली.

मिरज पॅटर्नला तोडीस तोड सांगली पॅटर्न आता तयार झाला आहे. त्यामुळे गटनेते किशोर जामदार यांची सद्दी आता संपली असल्याचे काँग्रेस नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

दिलीप पाटील यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी होणार हे स्पष्ट होते तसेच झाले. काँग्रेसमधील निर्मला जगदाळे यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले. त्याची अचूक संधी शेखर माने यांनी साधली. शनिवारी दिलीप पाटील यांचा अर्ज दाखल केल्यानंतर नाराज सदस्य श्रीमती जगदाळे व प्रदीप पाटील या दोन सदस्यांना अलगद बाजूला करत काँग्रेसला अधांतरी केले. पक्षातून निलंबन केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसला दिलेला फटका जिव्हारी लागणारा आहे. राष्ट्रवादीकडून मुख्य दावेदार असलेले राजू गवळी यांची उमेदवारी मागे घेऊन संगीता हारगे यांची उमेदवारी दाखल झाली.

काँग्रेसच्या पालिकेतील कारभाऱ्यांशी अतिसंपर्कामुळे श्री. गवळी यांची या वेळची संधी गेली. राष्ट्रवादीचे कारभारी संजय बजाज, विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी यांनी ऐन वेळी गवळी यांच्याऐवजी हारगे यांची उमेदवारी पुढे करून गौतम पवार व शेखर माने अनुकूल होतील याची दक्षता घेतली. अशी अनपेक्षित (राजकीय भाषेत अभद्र) युती होईल हे महापालिकेतील काँग्रेस कारभाऱ्यांच्या लक्षात आले तेव्हा खूप उशीर झाला होता. जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेल्या जयंतरावांना सांगलीच्या सत्तेत शिरकाव मिळाला आहे. मात्र ही सत्ता मिळवताना गौतम पवार आणि विशाल पाटील, शेखर माने या पक्‍क्‍या विरोधकांच्या पंक्तीत ते गेले आहेत. ही मंडळी एकत्र येऊ शकतात असे काल-परवा कुणालाही दिवास्वप्न वाटले असते; मात्र महापालिकेत सारे काही घडू शकते हेही स्पष्ट झाले.

संगीता हारगे या राष्ट्रवादीच्या असल्या तरी सभापती म्हणून त्या राष्ट्रवादी-उपमहापौर गटाच्या आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आणि महापालिकेतील सत्ता चौकडीला शह देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा दावा त्यांच्याकडून केला जाऊ शकतो. मात्र हा दावा किती काळ टिकतो हे पाहावे लागेल. एका अर्थाने स्थायी समिती सभापतिपद म्हणजे पालिकेच्या तिजोरीच विरोधकांच्या हाती आली आहे. सत्ताधारी मदन पाटील गटाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सभागृहात आवाज उठवणाऱ्या शेखर माने व गौतम पवार या जोडगळीसमोर स्थायीतील कारभाराबाबतही तोच आग्रह कायम ठेवावा लागेल. सत्ताधाऱ्यांशी साटेलोटे असलेल्या राष्ट्रवादीकडून मात्र पुढील काळात काँग्रेसशी असलेला याराणा कायम राहण्याची शक्‍यताच अधिक दिसते. तसे झाले तर शेखर माने यांना काँग्रेसच्या नेतृत्वाला एक फटका लगावल्याचे फक्त मानसिक समाधान तेवढेच मिळेल. बाकी कारभारात पुन्हा ये रे माझ्या मागल्याच असेल. 

जयंतरावांनी डाव साधला?
जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेल्या जयंतरावांना सांगलीच्या सत्तेत पुन्हा शिरकाव मिळाला आहे. मात्र ही सत्ता मिळवताना गौतम पवार आणि विशाल पाटील, शेखर माने यांच्या पंगतीत ते गेले आहेत. ही मंडळी एकत्र येऊ शकतात, हाच धक्‍का आहे. मिरज पॅटर्नला तोडीस तोड सांगली पॅटर्न आता तयार झाला आहे. त्यामुळे गटनेते किशोर जामदार यांची सद्दी आता संपली असल्याचे काँग्रेस नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com