काँग्रेसला मतदानासाठी शिवसेनेकडून मोठा व्यवहार

काँग्रेसला मतदानासाठी शिवसेनेकडून मोठा व्यवहार

कोल्हापूर - काँग्रेसला मतदान करण्यासाठी शिवसेनेने मोठा व्यवहार केला आहे. काँग्रेसला मदत करून त्यांनी आपला खरा चेहरा समाजाला दाखविला आहे. काँग्रेसने महापालिकेत केलेला भ्रष्टाचार, जमिनी हडप प्रकरणात आता शिवसेनेनेही त्यांना साथ दिली असल्याचा आरोप ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. स्थायी समिती सभापती निवडीत आमचा पराभव झाला असला तरीदेखील यापुढे आमचा लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुनील कदम म्हणाले, ‘‘आमचा लढा विकासासाठी आहे. आतापर्यंत तटस्थ असणाऱ्या शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला मत देऊन त्यांचा खरा चेहरा दाखविला आहे. जे जे आरोप दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर मी केले, त्यात आता शिवसेनाही सहभागी आहे. आयआरबीचे रस्ते, शहरातील मोक्‍याच्या जागा नेत्यांनी हडप केल्या आहेत.’’ सत्यजित कदम म्हणाले, ‘‘सव्वा वर्षात शिवसेना महापालिकेच्या निवडणुकीत तटस्थ राहिली आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाला शिवसेना आलीच कशी? यामध्ये निश्‍चितच व्यवहार झाला आहे.’’ 

विजय सूर्यवंशी यांनी भाजप-ताराराणी आघाडी खिलाडूवृत्तीने राजकारण करत आहे. पराभव झाला तरी आमची लढाई सुरूच राहणार आहे. या वेळी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचे सभापती राजसिंह शेळके, स्थायी समिती सभापतिपदाचे उमेदवार आशिष ढवळे, शेखर कुसाळे, अजित ठाणेकर आदी उपस्थित होते.

कांबळेंना काँग्रेसवाल्यांनीच गायब केले : सत्यजित कदम
सत्यजित कदम म्हणाले, ‘‘रीना कांबळे आमच्याकडे नाहीतच. काँग्रेसवाल्यांनीच त्यांना गायब केले आहे. गगनबावड्याच्या साखर कारखान्यावरच त्या आहेत, अशी आमची माहिती आहे. त्या जर आमच्याकडे असत्या तर आम्ही त्यांना मतदानाला आणले असते. काँग्रेसमध्ये खदखद होती. त्यातून कांबळे या आपल्याला मदत करणार नाहीत. त्यामुळेच त्यांना गायब केले.’’

शिवसेनेने दाखविली औकात : लिंग्रस
शिवसेनेची औकात दाखविणाऱ्या भाजपला कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेने काँग्रेसला मदत करून आपली औकात दाखवून दिली असल्याचा टोला शिवसेनेचे उपशहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनी पत्रकार परिषदेत लगावला. भाजपचा सभापती नको, हीच यामागे भूमिका होती. शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे. आमच्याकडे घोडेबाजाराला थाराच नाही, असेही लिंग्रस त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या राजकारणात गेले वर्षभर तटस्थ राहणाऱ्या शिवसेनेने स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मदत केली.  याबाबत लिंग्रस म्हणाले, की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली आहे. युती तुटल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेची औकात काढण्याचे धाडस केले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही महापालिकेत काँग्रेसला मदत केली आहे. भाजपचा सभापती होऊ नये, हीच यामागे भूमिका आहे. त्यासाठी मातोश्रीवरून आदेश आला आहे. 

दुधवडकर यांचा दाखविला मेसेज
खरेच मातोश्रीवरून आदेश आहे का, अशी विचारणा केली असता, हो सकाळी आम्हाला संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचा एसएमएस आला आहे, असे म्हणत त्यांनी हा एसएमएस पत्रकारांना दाखविला. ‘भाजपला विरोध’ इतका हा मेसेज होता.

घोडेबाजार नाहीच : प्रतिज्ञा उत्तुरे
प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, ‘‘शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे. मातोश्रीवरचा आदेशच आम्ही पाळतो. त्यामुळे आमच्या पक्षात घोडेबाजार नाही. सगळे सदस्य सहलीवर होते. आम्ही मात्र सकाळी दहा वाजेपर्यंत घरीच होतो. पक्षाकडून आदेश आल्यावरच आम्ही मतदानासाठी बाहेर पडलो. भाजपला विरोध असा पक्षाचा मेसेच होता.’’

आदेश डावलून मतदान : आमदार क्षीरसागर
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीबाबत आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘आज सकाळी दहा वाजता  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत शिवसेनेने नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो. ठाकरे यांनी तटस्थ राहण्याचा आदेश दिला होता. तसा मेसेज मी शिवसेनेच्या स्थायी समितीमधील सदस्य प्रतिज्ञा उत्तुरे यांना दिला होता; पण प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेसला मतदान केले आहे. यामध्ये नेमका काय प्रकार घडला आहे, याचा अहवाल मी पक्षप्रमुखांना देणार आहे. 

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीत तटस्थ राहा, असा पक्षाच्या प्रमुखांचा आदेश डावलून काँग्रेसला मतदान करण्याच्या प्रकाराची माहिती आपण वरिष्ठांना देणार आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार क्षीरसागर यांनी नोंदविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com