कॉंग्रेसच्या गोटात अजूनही शांतताच 

कॉंग्रेसच्या गोटात अजूनही शांतताच 

कोल्हापूर - राज्यात शिवसेनेसह भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना जिल्ह्यात कॉंग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर 2019 ची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातून दोन्ही कॉंग्रेसचे काही दिग्गज नेते त्यांच्या हाताला लागले असताना जिल्ह्यातील कॉंग्रेस नेतृत्वाकडून विरोधकांच्या हाताला कोण लागणार नाही, यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर 2004 व 2009 ची विधानसभा दोन्ही कॉंग्रेसने एकत्रित लढवली. मात्र 2014 मध्ये दोन्ही कॉंग्रेस विरोधात लढल्याचा मोठा फटका जिल्ह्यात कॉंग्रेसला बसला. कॉंग्रेसने 2014 मध्ये दहापैकी नऊ मतदार संघांत उमेदवार उभे केले, पण एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनाही धक्कादायक पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली. जिल्हा पातळीवरील नेत्यांतर्गत असलेले तीव्र मतभेद, त्यातून सुरू झालेले पाडापाडीचे राजकारण, कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीचा अभाव व या सर्वांकडे प्रदेश कॉंग्रेसकडून झालेल्या दुर्लक्षामुळे आज पक्षाची जिल्ह्यात ही अवस्था झाली आहे. 

शिरोळ, राधानगरी-भुदरगड, चंदगड, शिरोळ व कोल्हापूर उत्तरमध्ये कॉंग्रेसचा उमेदवार कोण, या प्रश्‍नाचे सध्या तरी नेत्यांजवळ उत्तर नाही. लोकसभा निवडणूक 2014 प्रमाणेच 2019 चीही दोन्ही कॉंग्रेस एकत्रित लढवतील. मात्र कॉंग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण, हाही प्रश्‍न अनुत्तरित आहे. या मतदार संघातील कॉंग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे जिल्हाध्यक्ष पी. एन. यांच्याशी मतभेद आहेत. त्यातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला साथ दिली. भविष्यात इचलकरंजी विधानसभेत आमदार सुरेश हाळवणकर यांना "बाय' देऊन प्रकाश आवाडे हेच भाजपचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत हातकणंगलेतून पुन्हा माजी मंत्री जयवंतराव आवळे किंवा त्यांचे पुत्र राजू, करवीरमधून पी. एन. पाटील स्वतः, राधानगरीतून अरुण डोंगळे, दक्षिणमधून आमदार सतेज पाटील हीच नावे कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून पुढे येतात. आमदार सतेज पाटील पुन्हा दक्षिणमधूच उतरणार की उत्तरमधून हे गुलदस्त्यात आहे. त्यांनी उत्तरमधूनही चाचपणी सुरू केली आहे. स्वतः रिंगणाबाहेर राहून पुतणे ऋतुराज पाटील यांनाही ते उत्तरमधून रिंगणात उतरविण्याची शक्‍यता राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. कागल, पन्हाळा-शाहूवाडी, चंदगड, शिरोळ, उत्तर याशिवाय श्री. आवाडे भाजपचे लोकसभेचे उमेदवार झाल्यास इचलकरंजीतही कॉंग्रेसला उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. 

अजून तरी पडझड नाही 
भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते त्यांच्या गळाला लागले. त्या तुलनेत कॉंग्रेसची फार मोठी पडझड झालेली नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई व शिरोळचे तालुकाध्यक्ष अनिल यादव वगळता पक्षातून मोठा नेता गेलेला नाही. 

संघर्ष यात्रेच्या निमित्ताने चैतन्य 
दोन्ही कॉंग्रेसच्या वतीने कर्जमाफी विरोधात काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा कोल्हापुरातून सुरू झाला. या यात्रेला कोल्हापुरातही चांगला प्रतिसाद मिळाला. गट-तट विसरून श्री. आवाडे, माजी आमदार बजरंग देसाई वगळता सर्वच नेते या यात्रेत सहभागी झाले. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले. हे वातावरण कायम ठेवणे कॉंग्रेसच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com