सावधान.. सोलापुरात मांजाच्या वापर, विक्रीवर पूर्णपणे बंदी! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मांजाचा वापर, विक्री, खरेदी, साठवणूक करण्यावर बंदी घातली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने आदेशानुसार पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी बंदीचे आदेश काढले आहेत.

सोलापूर - पशु-पक्ष्यांसह मानवाला धोकादायक ठरलेल्या नायलॉन, काचेरी आणि चायनीज मांजाच्या वापरासह निर्मिती, विक्री, खरेदी आणि साठवणूक करण्यावर पूर्णपणे बंदीबाबतचा आदेश पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी काढला आहे. 'सकाळ'ने मांजाबंदीबाबत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पोलिसांच्या आदेशाचे पक्षीप्रेमी संघटनांकडून स्वागत होत आहे. 

पर्यावरणप्रेमी खालीद अशरफ व श्रीमती राणी यांनी भारत सरकारविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेनंतर राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने धोकादायक असलेल्या मांजाचा वापर, विक्री, खरेदी, साठवणूक करण्यावर बंदी घातली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने आदेशानुसार पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी बंदीचे आदेश काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर निर्बंध घालूनही शहरात त्याची विक्री होत असल्याबाबत 'सकाळ'ने बातम्यांमधून पाठपुरावा केला होता. न्यायालयाच्या निर्णयाला धाब्यावर बसवून, नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षीप्रेमी संघटनांकडून करण्यात येत होती. मांजामुळे लहान मुले आणि दुचाकीस्वारांचे हात आणि गळा चिरल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात 'सकाळ'च्या कर्मचारी महिलेचा मांजाने गळा कापल्याने मृत्यू झाला आहे. 

पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी सोमवारी मांजा बंदीबाबतची माहिती जाहीर केली. 

मांजा सर्वांसाठीच धोकादायक आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निकालानुसार आम्ही सोलापुरात मांजाबंदीचा आदेश काढला आहे. यापुढे शहरात मांजा विक्री, वापर आणि साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त 

सुटी, सणासुदीच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जाते. आयुक्तांनी केलेल्या मांजाबंदीची माहिती पोलिस ठाण्यांमधून शाळा, महाविद्यालयांतही देण्यात येणार आहे. शहरात कोठेही विक्री होत असेल तर तक्रार करावी. 
- अपर्णा गिते, पोलिस उपायुक्त 

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशाची सोलापुरात आता पूर्णबंदीची अंमलबजावणी होणार आहे. पोलिस आयुक्तांचा आदेश खरोखरच स्वागतार्ह आहे. "सकाळ' आणि पर्यावरणप्रेमींच्या पाठपुराव्याचे हे यश आहे. 
- अॅड. मंजुनाथ कक्कळमेली, पर्यावरण विषयाचे अभ्यासक 

'सकाळ' आणि पक्षीप्रेमींच्या पाठपुराव्यानंतर पोलिस आयुक्तांनी मांजाबंदीचा आदेश काढला ही स्वागतार्ह बाब आहे. या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे. पोलिसांच्या मदतीने आम्ही शहरातील दुकानदारांची भेट घेऊन या आदेशाची माहिती देणार आहोत. 
- पप्पू जमादार, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल 

मांजामुळे पशु-पक्ष्यांसाठी मानवालाही धोका आहे. अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांच्या आदेशानुसार धोकादायक मांजाचा वापर करून पतंग उडविण्याची स्पर्धा घेणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. 
- मुकुंद शेटे, पर्यावरण अभ्यासक

Web Title: Consumption of Manza in Solapur Ban on Sale completely