कंटेनर घोटाळ्यावरून अधिकारी धारेवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कोल्हापूर - वर्कशॉपमधील कंटेनर घोटाळ्यावरून अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक अभियंता रावसाहेब चव्हाण यांना नगरसेवकांनी आज धारेवर धरले. महापालिकेला लुटायचे काम अधिकारी वर्ग करत असून, जर त्यांना चुकीची कामे करायची असतील, तर खुर्चीवर बसायचा अधिकारच नाही, अशा भाषेत नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

कोल्हापूर - वर्कशॉपमधील कंटेनर घोटाळ्यावरून अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक अभियंता रावसाहेब चव्हाण यांना नगरसेवकांनी आज धारेवर धरले. महापालिकेला लुटायचे काम अधिकारी वर्ग करत असून, जर त्यांना चुकीची कामे करायची असतील, तर खुर्चीवर बसायचा अधिकारच नाही, अशा भाषेत नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा आरोप करण्यात आला.

वर्कशॉपमधील कंटेनर घोटाळ्याचा विषय नगरसेवक भूपाल शेटे यांनी उपस्थित केला. कंटेनर खरेदीत सुमारे 60 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, 'नागपूर येथील कंपनीला याचा ठेका दिला. रेल्वेच्या रुळासाठी वापरले जाणारे लोखंड हे सर्वांत महाग असते; पण कंटेनरसाठी वापरलेल्या लोखंडाचा दर रुळासाठी वापरलेल्या लोखंडापेक्षा जादा आहे.'' थर्ड पार्टी ऑडिटसाठी दोन कंटेरनरची तपासणी केली असल्याचे रावसाहेब चव्हाण यांनी सांगितले.

या वेळी शारंगधर देशमुख, सत्यजित कदम यांनी पाटणकर, रावसाहेब चव्हाण यांना धारेवर धरत 300 कंटेनर तपासून का घेतले नाहीत, अशी विचारणा केली. यावेळी अधिकाऱ्यांना नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना उत्तरे देता येत नाहीत. त्यांना सभागृहाला काही कळू द्यायचे नाही. त्यांना या खुर्चीत बसण्याचाही अधिकार नाही. भूपाल शेटे यांनी तर कंटेनरसाठी वापरला गेलेला पत्रा किती बोगस आहे. हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचे नमुने त्यांनी सभागृहातच महापौर हसीना फरास यांच्याकडे दिले.

मीटररीडर पैसे खातात
शहरात मीटररीडरनी लूट सुरू केली असल्याचा आरोप किरण नकाते यांनी केला. एका ग्राहकाला कसे लुटले आहे, याचे उदाहरण देत नकाते यांनी पाणीपुरवठा विभाग चुकीची व बेकायदेशीर बिलाची आकारणी करत असल्याचे सांगितले. महेश सावंत, विजय खाडे यांनीही मीटररीडरनी अनेकांकडून बिल कमी करून देतो, असे सांगून पैसे खाल्ले आहेत. एखाद्या नागरिकाचे छोटेसे बांधकाम असले तरीदेखील मीटररीडर नागरिकांना भीती घालून पैसे उकळता, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शारंगधर देशमुख यांनी मीटररीडरनी जाग्यावर सरासरीने बिले काढली आहेत; पण आता स्पॉट बिलिंगमुळे नागरिकांना बिले वाढून आली आहेत. मागील थकबाकीसह बिलाचा मोठा भार नागरिकांवर पडत आहे. सत्यजित कदम यांनीही नागरिकांकडून पाणी कनेक्‍शनासाठी 17 ते 20 हजारांपर्यंतची रक्कम उकळली जात असल्याकडे लक्ष वेधले. राजसिंह शेळके यांनी पाणीपुरवठा विभाग प्लंबर आणि मीटररीडरच चालवतात, त्यांनी नागरिकांना लुटायचे काम सुरू केले आहे, असे सांगितले.

तर शंखध्वनी आंदोलन
विलास वास्कर म्हणाले, 'प्रभाग क्रमांक 40 दौलतनगर प्रभागातील अतिक्रमणाबाबत मी दीड वर्षे आवाज उठवत आहे. एका अतिक्रमणीत दुकानाला सील केले होते. ते सील काढून हे दुकान पुन्हा सुरू केले आहे. एका माजी नगरसेवकाचे हे दुकान आहे. तसेच एका पाण्याच्या हौदात टूमदार बंगला बांधला आहे. यावर कारवाई होणार आहे की नाही. किती वर्षे कारवाई करता. आता आमची पाच वर्षेही संपतील, अशीच डोळेझाक होणार असेल आणि कारवाई होणार नसेल, तर महापालिका सभेत शंखध्वनी आंदोलन करू.''

रुपाराणी निकम म्हणाल्या, 'नगरसेवकांना नोकरासारखी वागणूक मिळत असून, अधिकारी मालक असल्याच्या आर्विभावात वागत आहेत.''

थेट पाइप लाइनबाबत विशेष सभा होणार
कोल्हापूर शहराला थेट पाइप लाइनने पाणी आणण्याच्या योजनेसंदर्भात प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत नगरसेवक अजित ठाणेकर यांनी याबबात स्वतंत्र सभा घ्या, अशी मागणी केली. विजय सूर्यवंशी म्हणाले, 'जानेवारी 2017 ला काळम्मावाडीचे पाणी शहरात यायला हवे होते. अद्याप हे काम अपूर्ण असून, या कामाकडे लक्ष्य देण्याची गरज आहे.'' सुनील कदम यांनी जलअभियंता कुलकर्णी यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला आणि या कामासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी केली. प्रवीण केसरकर म्हणाले, 'थेट पाइप लाइनचे काम करत असताना ठेकेदाराला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ठेकेदार पूर्ण क्षमतेने कामच करू शकलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात गांभीर्याने चर्चा व्हायला हवी.''

तर "सावित्रीबाई'साठीही पैसे मिळतील
सावित्रीबाई फुले रुग्णालयात अनेक प्रकारचे स्क्रॅप आहे. हे स्क्रॅपही लिलावात काढल्यास या रुग्णालयालाही मदत होणार आहे. हे स्क्रॅप विकून येणारा पैसा या रुग्णालयाच्याच कामासाठी वापरायला हवा, असे मत सविता भालकर यांनी व्यक्त केले.