चिन्हावर सर्व जागा लढविण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

भाजपने कऱ्हाड दक्षिणमध्ये पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. पक्षाचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले यांच्यासह वरिष्ठ नेते युतीबाबतचा निर्णय घेतील. मात्र, कऱ्हाड दक्षिणमधील सर्वच गट व गणात पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी झाली आहे. दोन्ही काँग्रेसकडे सत्ता असतानाही त्यांच्याकडून कऱ्हाड दक्षिणमधील विकासकामांकडे झालेले दुर्लक्ष, केंद्र व राज्यात भाजप सत्तेत आल्यावर कऱ्हाड दक्षिणमध्ये झालेल्या विकासकामे मतदारांपर्यंत पोचवण्याचा ‘अजेंडा’ राहिल.

भाजपने कऱ्हाड दक्षिणमध्ये पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. पक्षाचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले यांच्यासह वरिष्ठ नेते युतीबाबतचा निर्णय घेतील. मात्र, कऱ्हाड दक्षिणमधील सर्वच गट व गणात पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी झाली आहे. दोन्ही काँग्रेसकडे सत्ता असतानाही त्यांच्याकडून कऱ्हाड दक्षिणमधील विकासकामांकडे झालेले दुर्लक्ष, केंद्र व राज्यात भाजप सत्तेत आल्यावर कऱ्हाड दक्षिणमध्ये झालेल्या विकासकामे मतदारांपर्यंत पोचवण्याचा ‘अजेंडा’ राहिल. मतदारसंघातील अनेक गावांत रस्ते, पिण्याच्या पाण्याची योजना नसल्याने असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून तो प्रश्‍न मार्गी लावला जाईल. पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या चांगली आहे. त्यांच्याकडून उमेदवारीची मागणी होत आहे. राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीत भाजपला चांगले यश मिळाले असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही मतदार भाजपला पसंती देतील, असा विश्‍वास आहे. दोन्ही काँग्रेसने केवळ घोषणा करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्याउलट केंद्र व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपने ग्रामीण भागातील शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून विकासाला प्राधान्य दिले आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपला चांगले वातावरण असून, मतदारांत परिवर्तन करण्याची इच्छा आहे. त्यामुळे निश्‍चितपणे केंद्र व राज्यात लोकांनी ज्याप्रमाणे सत्ता बदल केला, त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीत बदल करून कऱ्हाड दक्षिणला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भाजपच्या पाठीशी ठामपणे राहून मतदान करतील.

- विकास कदम, तालुकाध्यक्ष, भाजप.

काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य राखणार

कऱ्हाड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी आम्ही माजी मुख्यमंत्री आणि कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या माध्यमातून झालेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे घेवून जनतेसमोर जाणार आहोत. श्री. चव्हाण यांनी गटतट न पाहता कऱ्हाड दक्षिणमध्ये विकासकामे केली आहेत. त्यांच्या माध्यमातून कृषी महाविद्यालय, भूकंप संशोधन केंद्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बस स्थानकाचे नूतनीकरण आदी प्रकारची जनसामान्यांच्या गरजेची विकासकामे झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम झाले आहे. श्री. चव्हाण यांची मतदारांत असलेली ‘क्रेझ’ कायम आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही आम्ही स्वबळावर लढवण्याचा निर्धार केलेला आहे. गट व गणासाठी आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातून पृथ्वीराज चव्हाण जे उमेदवार देतील, त्यांना निवडून आणण्यासाठी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते निश्‍चितच प्रयत्न करतील. यावेळी कऱ्हाड दक्षिणध्ये आमदार श्री. चव्हाण यांच्या विचारांचे गट व गणातील सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला सर्वसामान्य मतदार साथ देतील, अशी आशा आहे. 

- राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

ताकद वाढल्यामुळे स्वबळावर लढणार 

दोन्ही काँग्रेसच्या आघा डीबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार असला, तरी कऱ्हाड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याने स्वबळावर लढण्याची तयारी आहे. गेल्या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीत पक्षाचा दक्षिणमधील एकही सदस्य नसला, तरी या वेळी स्थिती वेगळी राहणार आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, पंचायत समितीचे विद्यमान सदस्य ॲड. आनंदराव ऊर्फ राजाभाऊ पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे दक्षिणेतील पक्षाची ताकद निश्‍चितपणे वाढली आहे. आमदार बाळासाहेब पाटील, राजेश पाटील- वाठारकर यांच्याकडूनही पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्व गट, गणात उमेदवार देऊन ते निवडून येतील अशी आशा आहे. पक्षाकडून इच्छुकांची अर्ज भरण्यासह  १८ तारखेला मुलाखती होत आहेत. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, दक्षिणेतील सदस्य नसल्याने विकासकामांना निधी देण्यास अडचण आली. मात्र, या निवडणुकीनंतरही जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रवादी’चीच सत्ता येणार असून, त्यात कऱ्हाड दक्षिणमधून निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्याला चांगली संधी मिळणार आहे. सत्ता नसतानाही राष्ट्रवादीने केलेली कामे लोकांपर्यंत पोचवली जातील. त्याशिवाय जनतेला फसवून केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचे खरे रूप मतदारांना कळल्याने भाजपला दक्षिणेत थारा मिळणार नाही. काळ्या पैशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र, योग्य नियोजन करता न आल्याने ५० दिवसानंतरही जनतेचे हाल सुरू असून, राष्ट्रवादीचा प्रचारात हा मुद्दा राहील.

- दत्तात्रय पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

विकासाच्या मुद्यांवर रिंगणात उतरणार

विकासाच्या मुद्यांवर शिवसेना कऱ्हाड दक्षिणमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे. तशी तयारीही झाली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार असून तो निर्णय येईपर्यंत आम्ही स्वबळाच्या तयारीत राहात आहोत. जिल्हा परिषदेच्या कामाच्या सूचीत २०४ विकासकामांचा स्पष्ट उल्लेख आहे. यात शेती, पशुसंवर्धन, दुग्धविकास, शिक्षण, समाजकल्याण, वैद्यकीय सुविधा, पशुवैद्यकीय, इमारतीसह अन्य महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या बाबींचा विचार करता नियोजनबद्ध आराखडा तयार करून गेल्या ३० वर्षांत ग्रामीण स्तरावर विकासाची दर्जेदार अंमलब जावणी केली गेली नाही. त्यासाठी शिवसेना सक्षम असून केंद्र व राज्यात शिवसेना सत्तेतील एक महत्त्वाचा पक्ष असून त्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्ह्यात सत्ता नसतानाही कऱ्हाड दक्षिणमध्ये दीड कोटींची कामे दिली आहेत. त्यातील काही सुरू आहेत, तर काही कामे मंजूर आहेत. त्यामुळे सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी मतदार शिवसेनेला निवडून देतील. त्यामुळे पालकमंत्री श्री. शिवतारे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दक्षिणेतील गावांचा सर्वांगीण विकास केला जाईल. नियोजन समिती, डोंगरी विकास समितीच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून विकासकामे केली जातील. कोळेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारतीला पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी १५ लाखांचा निधी दिला असून त्यानुसार अन्य गावांनाही विकासकामांसाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा करू. 

- नितीन काशीद, तालुकाप्रमुख, शिवसेना

Web Title: Contest for the position of an icon