आता न्यायालयातील निकाल घरबसल्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

सांगली - न्यायप्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा आणि तालुका न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा न्यायालयात झालेल्या निकालाची प्रत, प्रकरणांची सद्य:स्थिती, दैनंदिन आदेश, प्रकरणांची माहिती, दिलेली तारीख या सर्व बाबींसाठी न्यायालयात हेलपाटे मारण्याची आता आवश्‍यकता नाही. जिल्हा न्यायालयाचे संकेतस्थळ court.mah.nic.in किंवा ecourts.gov.in/sangli यावर घरबसल्या माहिती मिळू शकेल. 

पक्षकारांना त्यांच्या केसची सद्य:स्थिती, पुढे दिलेली तारीख एसएमएसद्वारे पाठवण्याची सुविधा जिल्हा न्यायालय आणि त्याअंतर्गत असलेल्या इतर तालुका न्यायालयात उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी पक्षकारांनी त्यांचा मोबाईल क्रमांक संबंधित न्यायालयातील लिपिक अथवा संगणक विभागाकडे रजिस्टर करावा.

गव्हर्न्मेंट रिसिट अकाऊंटिंग सिस्टीम (ग्रास) या सेवेद्वारे इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमाचा वापर करून कोर्ट फी भरण्याची सुविधा जिल्हा आणि तालुका न्यायालयात केली आहे. पक्षकारांना दाव्यांची नोंदणी ई-फायलिंग सेंटरद्वारे एकत्रितपणे करून देण्याची सोय देखील जिल्हा व तालुका न्यायालयात आहे. जिल्हा न्यायालय आणि इतर तालुका न्यायालयात १७ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग युनिट कार्यरत आहेत. कारागृहात असलेल्या संशयित  आरोपींना न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याचे कामकाज दाखवले जाते. त्यामुळे त्यांना ने-आण करण्यासाठी पोलिस व कारागृह कर्मचाऱ्यांवर येणारा ताण कमी होतो. दूरवर असलेले तपास अधिकारी, सरकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सवर घेतल्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होते.

पक्षकारांच्या वेळेची आणि पैशाची बचत व्हावी या उद्देशाने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी पक्षकारांनी जिल्हा तसेच तालुका न्यायालयात संगणक विभागाकडे संपर्क साधून उपयोग करून घ्यावा. न्यायप्रक्रिया गतिमान करण्यासाठी पक्षकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा न्यायालयातील व्यवस्थापक एस. एम. कुलकर्णी यांनी केले आहे.