नाट्यगृह नेटके; पण पूरक सुविधांत कंजुषी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कोल्हापूर - शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गेल्या काही वर्षांत आलेली अवकळा दूर होऊन नाट्यगृहाची इमारत अधिक सौंदर्यपूर्ण झाली. ८ कोटींच्या खर्चातून अंतर्बाह्य व्यवस्था सुसज्ज, प्रशस्त, नेटकी बनली. मात्र ध्वनियंत्रणेपासून ते कँटीन सुविधेपर्यंत अवघ्या काही लाखांच्या खर्चासाठी महापालिकेने कामाची कंजुषी केली आहे.  

कोल्हापूर - शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गेल्या काही वर्षांत आलेली अवकळा दूर होऊन नाट्यगृहाची इमारत अधिक सौंदर्यपूर्ण झाली. ८ कोटींच्या खर्चातून अंतर्बाह्य व्यवस्था सुसज्ज, प्रशस्त, नेटकी बनली. मात्र ध्वनियंत्रणेपासून ते कँटीन सुविधेपर्यंत अवघ्या काही लाखांच्या खर्चासाठी महापालिकेने कामाची कंजुषी केली आहे.  
सुशोभीकरणानंतर चकाचक झालेली इमारत व आवार कलाकार, रसिकांच्या गर्दीने सतत गजबजतो आहे. यातून महसूल मिळण्याबरोबरच शहराची सांस्कृतिक भूकही भागते. मात्र किमान सुविधांच्या अभावाचा शाप येथे नव्याने लागल्याचे दिसत आहे. इमारत आवारातील स्वच्छतागृहाला अवकळा आली आहे. कँटीनचा कक्ष आहे; पण कँटीन सुरू नाही. या दोन महत्त्वाच्या सुविधा देण्यास पालिकेची चालढकल सुरू आहे.

नूतनीकरणादरम्यान ८० लाख रुपये खर्चून ध्वनियंत्रणा बनविली. पण ती ऑपरेट करण्यासाठी प्रशिक्षित माणूस मिळत नसल्याचे सांगण्यात येते. थिएटर नव्याने सुरू होण्यापूर्वी काही अनुभवी व्यावसायिक ध्वनितंत्रज्ञ असलेल्या चार व्यक्तींनी संपर्क साधला होता. मात्र तांत्रिक पातळीवर नकार देण्यात आला. 

मुंबईत अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काम केलेल्या तांत्रिक कारागिरांची संख्या मोठी आहे. तसेच विविध चित्रपटांचे ध्वनिमुद्रण सांभाळणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. याशिवाय ध्वनियंत्रणा ज्या कंपनीने दिली त्या कंपनीकडे प्रशिक्षित कर्मचारी, अभियंते असतात. त्यातील एखादा, कोणी निवृत्त झालेला किंवा पर्यायी नोकरीच्या शोधात असलेल्या  अनुभवी व्यक्ती सापडल्या नाहीत का याविषयी शंका आहे. 

नाट्यकलावंत मुंबई पुण्यातून येथे येतात. कला सादर करतात जाता-जाता ध्वनियंत्रणेला नावे ठेवून जातात. त्यांची ध्वनिमुद्रण क्षेत्राशी जवळीक असते. त्यातून एखादा तरी जाणकार ध्वनिमुद्रक येथे मिळू शकला असता. पण पदाच्या मंजुरीपासून वेतन भत्त्यापर्यंतच्या तांत्रिक बाबींवर महापालिकेच्या पातळीवर दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रसिक येथे येतात. दोन-चार तास येथे थांबतात. अशा ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय सक्षम असणे गरजेचे आहे; पण केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छतागृह असले तरी आत गलिच्छपणा असतो. तेथे स्वच्छतागृहाचा वापर करणे अनेकदा मनस्तापाचे ठरते. त्यामुळे स्वच्छता व सुरक्षेची पुरेशी काळजी घेऊन स्वच्छतागृह सक्षम करणे गरजेचे आहे.

- वैदेही जोशी, शहर महिला संघटक ग्राहक पंचायत समिती
 
मध्यंतरावेळी वा कार्यक्रमाआधी कलावंत-रसिकांना किमान अल्पोपहार व चहा-नाष्टा-कॉफी-शीतपेय आवारात मिळण्यासाठी येथे कँटीनची गरज आहे. अद्यापही कँटीनचा ठेका दिलेला नाही. शुद्ध व्यावसायिक असलेले मग अर्धा कप चहा दहा रुपयांना विकतात. त्याला दर्जाही नसतो. रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यानंतर कलावंतांसाठी नाष्टा-जेवणाची सोय नाही. त्यामुळे येथे कँटीन सुरू करणे गरजेचे आहे.

- बी. एम. कांबळे, हौशी रंगकर्मी