फटाक्‍यांचा आवाज कमी; लक्ष्मीपूजनादिवशी मात्र वाढला...! 

shivaji-university
shivaji-university

कोल्हापूर - यंदाच्या दिवाळीत शहराच्या निवासी भागापेक्षा व्यापारी कार्यक्षेत्रात लक्ष्मीपूजनादिवशी सर्वाधिक ध्वनिप्रदूषण झाले. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने 28 ऑक्‍टोबर ते एक नोव्हेंबरअखेर विविध भागांत ध्वनिमापक यंत्राद्वारे नोंदी घेतल्या. त्याचा अहवाल आज विभागाने प्रसिद्ध केला असून, गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा फटाक्‍यांचा आवाज कैक पटीने कमी झाला असल्याचे सकारात्मक चित्र असले तरी ध्वनिप्रदूषण नियमानुसार अजूनही आवाजाची मर्यादा ओलांडली आहे. दरम्यान, विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी राबवलेले विविध जनजागृतीपर उपक्रम, फटाक्‍यांच्या वाढत्या किमती अशा विविध कारणांमुळे शहराची वाटचाल फटाकेमुक्त दिवाळीकडे सुरू झाली आहे. 

शहराच्या निवासी क्षेत्रातील राजारामपुरी, उत्तरेश्‍वर पेठ, ताराबाई पार्क, शिवाजी पेठ, नागाळा पार्क, मंगळवार पेठ या सहा ठिकाणी, तर व्यापारी कार्यक्षेत्रात राजारामपुरीसह शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, गंगावेस, बिंदू चौक आदी दहा ठिकाणी आवाजाच्या नोंदी घेतल्या. सीपीआर, कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ या सायलेंट झोनसह शिवाजी उद्यमनगर आणि वाय. पी. पोवारनगरातही नोंदी घेण्यात आल्या. 
शहराचा एकूणच सरासरी विचार करता सर्वच ठिकाणी दिवाळीतील पाच दिवसांत रात्री 80 डेसिबलपेक्षा कमी आवाजाची मर्यादा राहिली; मात्र लक्ष्मीपूजनादिवशी बहुतांश सर्व ठिकाणी 80 डेसिबलची मर्यादा ओलांडली गेली. गुजरी कॉर्नरला सर्वाधिक 86.8, तर गंगावेस आणि मंगळवार पेठेत त्या खालोखाल 85.8 डेसिबल इतकी नोंद झाली. पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. एस. बी. मांगलेकर, पल्लवी भोसले यांच्यासह अक्षय पाटील, आकाश कोळेकर या "एमएस्सी'च्या विद्यार्थ्यांनी ही मोहीम पूर्ण केली. 

निसर्गमित्र संस्थेतर्फे 12 व 13 नोव्हेंबरला सहल 
येथील विविध पर्यावरणप्रेमी संघटनांनी यंदाही "चला, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करू या' असे आवाहन करताना मुलांसाठी विविध विधायक पर्यायही उपलब्ध करून दिले. फटाक्‍यांचे पैसे वाचवून गरजू-अपंग मुलांना मदत, वैज्ञानिक खेळणी, नवीन पुस्तकांची खरेदी, ऊर्जेचा आकाश कंदील, निसर्गसहली - गडकिल्ल्यांची भ्रमंती अशा उपक्रमांचे आयोजन झाले. निसर्गमित्र संस्थेने यंदाही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणाऱ्या मुलांसाठी दोनदिवसीय निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. 12 व 13 नोव्हेंबरला ही सहल किल्ले भुदरगड येथे होणार असून देवराई आणि ग्रामीण जीवन त्यातून अनुभवता येणार आहे. 

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फटाक्‍यांचा आवाज कमी झाला असला तरी ध्वनिप्रदूषण नियमानुसार आवाजाची मर्यादा अजूनही ओलांडलेली दिसते. आता येत्या काळात याबाबत प्रबोधन व प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांवर भर देणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. पी. डी. राऊत (पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ) 

फटाक्‍यांच्या आवाजाबाबत लोकांत जागृती झाली आहे; मात्र बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या फटाक्‍यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. महापालिका, पोलिस आणि विशेषतः प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कारवाई करत नसल्याने आवाजाची मर्यादा ओलांडलेली दिसते. 
- उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com