चोरटे शिरजोर... पोलिस कमजोर

घनशाम नवाथे
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

सांगली - जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी पोलिसांनी दक्ष नागरिक उपक्रम राबवला. नंतरच्या अधिकाऱ्यांनी पोलिसच दक्ष असले पाहिजेत, म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न केले. ‘बेसिक पोलिसिंग’सारखी संकल्पना राबवली.

सांगली - जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी पोलिसांनी दक्ष नागरिक उपक्रम राबवला. नंतरच्या अधिकाऱ्यांनी पोलिसच दक्ष असले पाहिजेत, म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न केले. ‘बेसिक पोलिसिंग’सारखी संकल्पना राबवली.

कारवाईवर अधिक भर दिला. नवीन अधिकारी आले की नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला जातो. जनतेसाठी विविध उपक्रम राबवून पोलिस आणि त्यांच्यात संवाद साधणे हा त्यामागचा उद्देश असतो. नागरिकांना पोलिसांकडून सौजन्याची वागणूक जशी अभिप्रेत असते त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर वचक असावा ही देखील भावना असते. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोरी, बॅग लिफ्टिंग, चेन स्नॅचिंगसारखे प्रकार घडत आहेत. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे एकीकडे ‘मोका’, ‘झोपडपट्टीदादा’ सारखे हत्यार उपसून कारवाई करत आहेत. परंतु पोलिस ठाणेस्तरावरील अधिकारी मात्र फारसे प्रयत्नशील दिसत नाहीत. घडणारे गुन्हे आणि उघडकीस येण्याचे प्रमाण यात तफावत आहे. चोरटे, गुन्हेगार शिरजोर आणि पोलिस कमजोर, असेच काहीसे चित्र सांगली परिसरातील आहे.

दृश्‍यमान पोलिसिंग हवे
चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात बेसिक पोलिसिंग संकल्पना राबवली गेली. खाकी गणवेशातील पोलिस सकाळपासून प्रमुख चौकात दिसायचे. पोलिस दिसू लागल्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली होती. तसेच पोलिसांच्या भीतीने छेडछाडीचे प्रकारही टाळले गेले. काही घडले तर तत्काळ पोलिसांची मदत मागता येत होती. ‘पोलिस मदत केंद्र’ असा उल्लेख असलेला शामियाना कम चौकीही कार्यरत ठेवली गेली. चौकीत कोणी जरी नसले तरी आजूबाजूला पोलिस असतील अशी सतत भीती वाटायची. सध्या अशी परिस्थिती दिसत नाही. पोलिस फक्त दुचाकीवरून ड्युटीवर जातानाच दिसतात.

पोलिस चौक्‍या बंद
एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यापुरते किंवा काहीतरी काम असले तरच पोलिस चौकीच्या कुलपाला चावी लावून ती उघडली जाते. इतरवेळी पोलिस चौकी चोवीस तास बंदच असते. प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत नियंत्रण असावे या उद्देशाने चौक्‍या स्थापून तेथे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली जाते. परंतु पोलिस ठाण्यातूनच कामकाज पार पाडले जाते. पोलिस चौक्‍या जर दिवसा आणि रात्री काही काळ जरी उघडल्या तरी परिसरात नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होते. त्यादृष्टीने पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

गुन्हे प्रकटीकरण सक्षम हवे
पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागात काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा गुन्हेगारांची माहितीच नसते. आपल्या हद्दीतील आणि शेजारील पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगार, त्यांचे मित्र आणि हालचालीची खडान्‌खडा माहिती घेतली पाहिजे. गुन्हेगारांची तोंडओळख ‘डीबी’ तील कर्मचाऱ्यांना आवश्‍यकच आहे. तसेच हद्दीतील खबऱ्याचे नेटवर्क फारच गरजेचे आहे. त्याशिवाय गुन्हेविषयक हालचालींची माहितीच मिळत नाही. दुर्दैवाने सांगली, विश्रामबाग येथील डीबीचे कामगिरी खालावलीच आहे.

नागरिकही दक्ष हवे
नागरिकांची दक्षताही फार महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत पोलिस पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागात लक्ष ठेवून संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी. घर बंद करून जाताना पोलिस ठाण्यात व शेजाऱ्यांना माहिती द्यावी. घराचे कडी-कोयंडे मजबूत ठेवावेत. सीसीटीव्ही, अलार्म सिस्टीमचा वापर करावा. दागिने लॉकरमध्ये ठेवावेत. महिलांनी देखील एकटे-दुकटे जाताना दागिन्यांचे प्रदर्शन टाळले पाहिजे.