पुण्यातील वॉन्टेड खंडणीखोर सांगलीत जेरबंद

Sangli
Sangli

सांगली : पुण्यातील चतुश्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या
एका अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यातील दोन संशयितांना सांगली स्थानिक
गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. निलेश रामचंद्र शिंदे आणि शैलेश
शंकर शिंदे अशी त्यांची नावे असून त्यांना चतुश्रुंगी पोलिसांच्या हवाली
करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या वर्षी पुणे-बंगलोर
महामार्गाजवळून गणेश नारायण राठोड या युवकाचे अपहरण करण्यात आले होते.
यामध्ये पाचजण संशयित आरोपी होते. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात
गणेशचे वडील नारायण मानसिंग राठोड यांनी तक्रार दिली होती. यातील एक
संशयित नितीन शिंदे याला चतुश्रुंगी पोलिसांनी अटक केली होती. मात्र इतर
चौघेजण फरार होते. या गुन्ह्यात "वॉन्टेड' असलेले निलेश रामचंद्र शिंदे
(वय 27, रा. चांदोली वसाहत, वाळवा जि. सांगली) आणि शैलेश शंकर शिंदे (वय
26, रा. अष्टविनायक नगर चौक, शिरगाव, ता. वाळवा) हे दोघे गुन्ह्यानंतर
चतुश्रुंगी पोलिसांना चकवा देवून गावातच रहात होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस शिपाई चेतन महाजन यांना या दोघांबाबत
माहिती मिळाली होती. त्याची खात्री करुन स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस
निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोघांनाही
त्यांच्या गावातूनच ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची चौकशी केली असता
त्यांनी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची कबुली दिली.

यामध्ये गणेश राठोड याचा मेहुणा विलास चव्हाण याचे अपहरण संशयितांनी केले
होते. त्यावेळी गणेशने त्यांच्या मध्यस्थी केली होती. मात्र चव्हाणने
आरोपींना ठरलेली रक्कम दिली नाही म्हणून या पाचजणांनी गणेशचे अपहरण केले
होते. यातील दोघांना सांगली पोलिसांनी अटक करुन चतुश्रुंगी पोलिसांच्या
ताब्यात दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com