दारुच्या नशेने कुटुंब उद्‌ध्वस्त; मुलगा अनाथ

murder
murder

सातारा : दारूचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. साताऱ्यात एका बांधकाम कामगाराचे कुटुंब पूर्ण उद्‌ध्वस्त झाल्याचे उदाहरण समोर आले आहे. पती राजू साळुंखे याच्या नशापानाणे त्याने पत्नीला गमावले असून राजू अटकेत असल्याने सात वर्षाच्या त्यांचा मुलगा अनाथ झाला आहे. या घटनेने संपूर्ण सातारा सुन्न झाला आहे. 

करंजे (ता. सातारा) येथे बुधवारी रात्री राजू दीपक साळुंखे (वय 45, रा. 434, करंजे) याने बांधकाम ठेकेदार रहिनाथ श्रीधर लोणकर (रा. बाबर कॉलनी, करंजे), घर मालक अंजना शंकर कदम व शेजारी राहणाऱ्या शालन गोविंदराव लिंगाडे यांच्यावर चाकूने वार केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर मानसिक तणावात गेलेल्या त्याची पत्नी अनिता (वय 35, रा. करंजे) हिने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू याचा पुणे जिल्ह्यातील पौंड येथे राहात असताना अनिता यांच्याशी प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर गेली अकरा वर्षे ते साताऱ्यात राहात आहेत. पैकी गेली चार वर्षे ते करंजे येथील घरात भाड्याने राहतात. सध्या तो रहिनाथ यांच्याकडेला कामाला होता. काल सायंकाळी साडेसातला रहिनाथ बाबर कॉलनी येथून करंजे परिसरात निघाले होते. त्यांच्या घराच्या थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीजवळ राजूने त्यांना थांबविले. तो नशेत होता. घराजवळ सोडण्याची विनंती त्याने त्यांना केली. त्यानुसार त्यांनी त्याला दुचाकीवर घेतले. मात्र, थोड्याच अंतरावर त्याने गाडी थांबविण्यास सांगितले. खाली उतरल्यावर पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी एक हजार रुपये द्या असे तो रहिनाथ यांना म्हणाला. तो पिलेला असल्याने त्यांनी उद्या सकाळी पैसे देतो असे सांगितले. त्यामुळे चिडून राजूने त्याच्या जवळच्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर तो पळून घरी गेला. 
घरी गेल्यावर त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. तिच्यावर चाकूने वार करणार तोच घर मालक अंजना व शेजारी राहणाऱ्या शालन भांडण सोडविण्यास गेल्या. झटापटीत राजूने त्यांच्यावरही वार केले. या गोंधळामुळे शेजारी राहणारे लोक गोळा होऊ लागले. त्यामुळे राजूने तेथून पळ काढला. परिसरातील नागरिक त्याचा पाठलाग करत होते. त्याच वेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याची पोलिस गाडी तेथे आली. त्यांनी पाठलाग करून राजूला ताब्यात घेतले. रहिनाथ यांच्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, राजूला अटक झाल्यानंतर रात्री अनिता त्याला पाहण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. घरी परतल्यावर सात वर्षाच्या मुलासोबत त्या झोपल्या. सकाळी मुलाला जाग आली. त्या वेळी अनिता यांनी गळफास घेतला असल्याचे निर्दशनास आले. मुलाने गोंधळ केल्यानंतर स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. 

अनिता यांच्या नातेवाइकांची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नव्हती. तसेच राजूही त्याच्या नातेवाईकांबाबत काही माहिती पोलिसांना देत नव्हता. त्यामुळे अनिता यांच्या मृत्यूबाबत कोणाला कळवायचे असा प्रश्‍न पोलिसांसमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com