गुन्हेगारीच्या एका तपात 25 गुंडांची "गेम' 

गुन्हेगारीच्या एका तपात 25 गुंडांची "गेम' 

सांगली - गुन्हेगारी वर्तुळात कळत-नकळत आलेल्या गुंडांचे अस्तित्व फार काळ टिकत नसल्याचा सांगलीचा इतिहास सांगतो. गुन्हेगारीच्या एका तपात एक-दोन नव्हे तर तब्बल 25 गुंडांची डोळ्यादेखत भरदिवसा "गेम' करण्यात आल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. खून का बदला खून म्हणून अनेकजण येथे खपले. गुंडगिरी सहन न झाल्यामुळे काही गुंडांचा खून करण्यात आला. गुंडच गुंडांचे अस्तित्व संपवत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी झाली आहे. मात्र त्यातून नवे गुंड डोके वरती काढत आहेत. 

सांगलीतील गुंडगिरीचा इतिहास पाहिला तर या वर्तुळात आलेले अनेकजण इतिहासजमा झालेत. गुंड राजा पुजारी आणि दादा सावंत यांचा संघर्ष अनेकांनी पाहिला. पुजारीचा "एन्काऊंटर' झाल्यानंतर अनेक गुंड स्वत:हून तडीपार झाले. तीन-चार वर्षे सांगली चांगली राहिली. परंतु नवे गुन्हेगार येथे जन्माला आले. 2006 पासून गुंडगिरी पुन्हा सुरू झाली. नगरात तसेच उपनगरात दादागिरी वाढली. प्रत्येकाने आपापला "इलाका' बनवला. 2006 मध्ये भरदिवसा संजय पोतदार, सोमनाथ सपकाळ यांचा भरदिवसा खून करण्यात आला. या खुनातील संशयित विजय पवार पुढे पॅरोलवर आल्यानंतर त्याचा खून करून बदला घेतला. 

कारखाना परिसरात विजय रजपूत चा 2006 मध्ये खून करण्यात आला. त्याचा बदला म्हणून रफीक शेखचा वर्षातच खून केला. संजयनगर परिसरात गुंडाचे नेटवर्क तयार केलेल्या विठ्ठल शिंदे याचा 2007 मध्ये खून केला. त्याचा बदला म्हणून कोंडीबा शिंदेचा खून केला. टिंबर एरिया कामगाराचा खून करणाऱ्या मिर्झाचा खून केला गेला. वाहिद रंगारी, रोहित झेंडे, संजय कोले, अकबर अत्तार, विलास घाटगे, बाळू मगदूम, दादा सावंत, दीपक पाटील, इम्रान मुल्ला, रवींद्र कांबळे, मिणच्या गवळी याच्यानंतर दोन दिवसांपूर्वी तडीपारीचा भंग करून आलेला गुंड रवींद्र माने याचा खून करण्यात आला. 

गुन्हेगारीच्या एका तपामध्ये तब्बल 25 गुंडांचे खून करण्यात आले. गुंडगिरीचा शेवट भयानक असतो हे मरणाऱ्या आणि मारणाऱ्या गुंडांनीच सिद्ध केले आहे. गुन्हेगारी वर्तुळाचे आकर्षण चित्रपटात दाखवले जाते त्याप्रमाणे निश्‍चितच नसते. भल्याभल्या गुंडांचा खून येथे झालेला आहे. सांगलीच्या गुन्हेगारीचा इतिहासच सर्वकाही स्पष्ट करतो. कळत-नकळत आलेले अनेकजण गुंडगिरीतून बाहेर पडले आहेत. 

सांगलीतील टोळीयुद्ध पोलिस कारवाईमुळे थंडावले आहे. परंतु अधून-मधून काही ठिकाणी संघर्ष उफाळून येतो. मन आणि मनगटाच्या जोरावर गुंडगिरी करणाऱ्यांना राजकारणी मंडळी "मनी पॉवर' पुरवत आहेत. सध्या आघाडीच्या राजकीय पक्षात गुन्हेगारांचा भरणा दिसून येतो. गुंडगिरीतून राजकारणात येऊन काहींनी पदे मिळवली आहेत. गुन्हेगारीचा चेहरा झाकून राजकीय मुखवटा लावला आहे. परंतु त्यामागील गुंडगिरी जिवंत आहे की नाही हे येणारा काळच ठरवेल. 

"मोका' मध्ये पाच टोळ्या- 
गुंड महंमद नदाफ, गुंड दुर्गेश पवार यासह मोठ्या पाच टोळ्या सध्या "मोका' खाली कारागृहात आहेत. सध्याचे "एसपी' दत्तात्रय शिंदे यांनी एंट्री केल्यानंतर पाच महिन्यांत चार टोळ्यांतील 27 जणांना मोका लावला. झोपडपट्टीदादा कायद्यानुसार आठजणांना स्थानबद्ध केले. हे गुन्हेगार कारागृहात असल्यामुळे गुन्हेगारी हालचाली थंडावल्या आहेत. गुन्हेगारांवर सतत कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com