भाजपलाही झाली गटबाजीची बाधा

भाजपलाही झाली गटबाजीची बाधा

खरे तर भारतीय जनता पक्षाचे सध्या तसे बरे चालले आहे. जिल्हा परिषद, पालिका, ग्रामपंचायती या सर्वच निवडणुकांत सर्वत्र ‘कमळ’ फुलू लागले आहे. अगदी नुकत्याच झालेल्या महापालिकेतही अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाज आणि काँग्रेसच्या मातब्बरांना मोठा धक्‍का देत भाजपने काँग्रेसकडून महापालिका काढून घेतली. या सर्व विजयाचे श्रेय कोणा एका नेत्याचे नाही. लोकांनीच दोन्ही काँग्रेसला कंटाळून भाजपकडे सत्ता सोपविली आहे. मात्र यश मिळविले तरी ते पचविणे सोपे नसते, याचा अनुभव आता येऊ लागला आहे.

एवढे यश जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या पदरात टाकूनही एकही मंत्रिपद भाजपच्या वाट्याला जिल्ह्यात येऊ नये, हे भाजपच्या रणनीतीचे सर्वांत मोठे अपयश आहे. सत्ताकाळ संपत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संजय पाटलांना आधी कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष केले आणि त्यांना आता कॅबिनेटचा दर्जा देऊन त्यांचे पक्षातील महत्त्व वाढविले आहे. अनेकांना हे रुचलेलेही दिसत नाही. एकूणच भाजपमध्ये सारे काही आलबेल चाललेले नाही, याचे भेदक सूर ‘गोपीचंद’वाणीतून कानी येत आहेत. 

गोपीचंद पडळकर भाजपमधील एक तरुण नेतृत्व आहे. धनगर समाजाचे नेतृत्व करीत असल्याने त्यांचे पक्षातील स्थान तसे महत्त्वाचे आहे. मात्र ते ज्या खानापूर-आटपाडी तालुक्‍यातून नेतृत्व करतात, तेथे एकापेक्षा एक नेत्यांशी त्यांना टक्‍कर द्यावी लागते. येथे काँग्रेसचे दिग्गज माजी आमदार सदाशिवराव पाटील, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख अशा नेत्यांशी झुंजत पडळकरांचे नेतृत्व पुढे आले आहे. संजय पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीपासून पडळकर भाजपमध्ये आहेत. संजय पाटलांची ‘एंट्री’ झाली आणि पडळकरांची साडेसाती सुरू झाली. कारण त्यानंतर राजेंद्रअण्णा भाजपमध्ये आले.

कोणत्याही क्षणी सदाशिवराव पाटलांचीही भाजपमध्ये एंट्री होऊ शकते, असे अंदाज वर्तविले जात आहेत. कारण सदाशिवरावांचे आणि संजयकाकांचे असलेले स्नेहबंध यामागे आहेत. त्यामुळे पडळकर भाजपवर म्हणण्यापेक्षा खासदारांवर खपा आहेत. 
पण, फक्‍त पडळकरच नाही तर शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे हे दोन्ही आमदारही खासदारांवर नाराज आहेत. आपल्या कक्षा वाढविण्याच्या नादात संजयकाकांनी खाडेंना मिरज तालुक्‍यातील काही गावांत डिवचले आहे. त्यातच आता पडळकरांनी खाडे व नाईकांना खासदारांच्या कारस्थानामुळे मंत्रिपद मिळाले नाही, असा बॉम्ब टाकल्याने मंत्रिपदाच्या जखमावरील खपल्या निघाल्या आहेत. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील एका कार्यक्रमात बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी संजयकाकांनी ‘जिल्ह्यात पोकळीच पोकळी आहे, हवे तिकडे घुसा’, असा सल्ला दिला होता. काकांनी तो आधीच मनावर घेतला होता. अर्थात, भाजपमध्ये अजून तरी संजयकाका सांगे आणि नेते डोले अशी स्थिती नाही. त्यामुळे खाडे किंवा नाईक यापैकी एकाला जे मंत्रिपद मिळणार होते, ते का टळले, याची कारणे शोधावी लागतील. त्यामुळे गोपीचंदांनी दिलेल्या पासवर खाडेंनी मंत्रिपद कोणामुळे अडले, याची शहानिशा करा, असे म्हणत चेंडू धावता ठेवला आहे. त्यामुळे भाजपमधील चार आमदार, जिल्हाध्यक्ष विरुद्ध खासदार असे सुरू असलेले शीतयुद्ध कोणत्याही क्षणी महायुद्धात रुपांतरित होऊ शकते.

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संजयकाकांचे संबंध वालचंद कॉलेज प्रकरणावरून मध्यंतरी विकोपाला गेले होते. यात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. भाजपमधील पश्‍चिम महाराष्ट्राची धुरा चंद्रकांतदादांकडे आहे. त्यांचे आणि खासदारांचे संबंध कसे आहेत, तेही लोकांना कळले आहे. महापलिका निवडणुकीची जबाबदारी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे एकहाती देण्याचा निर्णय चंद्रकांतदादांचा होता. त्यावरूनही राजकारण पेटलं असतं, पण भाजपच्या शीर्ष नेत्यांनी ही परिस्थिती चांगली हाताळल्याने आणि सुधीरदादांच्या संयमामुळे येथील संघर्ष टळला, असे बोलले जाते. 

भाजपमध्ये हे सारे असे का घडतेय आणि त्याला एकटे कोणते घटक जबाबदार आहेत, यावर जरा लक्ष दिले तर असे लक्षात येते, की यापूर्वी प्रदीर्घकाळ काँग्रेसचीच सत्ता सर्वत्र राहिली आहे आणि दिवंगत नेते प्रकाशबापू पाटील प्रदीर्घ खासदार राहिले. त्यानंतरच्या दीड टर्म त्यांचे पुत्र प्रतीक पाटील खासदार होते. या दोघांचे नेतृत्व सारा जिल्हा कवेत घेण्यासाठी आक्रमक झाले नाही. प्रकाशबापू तर तसे अजातशत्रू होते. ते कोणा आमदारांच्या किल्ल्यात हस्तक्षेप करीत नसत. पण, संजयकाका हे भाजपचे येथील पहिलेच खासदार आहेत. त्यांनी जिल्ह्यातील आपला बेस वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी आपले गट निर्माण केले आहेत. तो वेग आता थोडा वाढला आहे. हे सर्व भाजपच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ संस्कृतीपेक्षा वेगळे आहे. कदाचित, आमदारांना खासदारांचा हा स्वभाव खटकत असावा.

एवढे दिवस भाजपमध्ये दबलेला हा संघर्ष आता गोपीचंदांच्या सुरामुळे चव्हाट्यावर येऊ लागला आहे. संजयकाका जरी म्हणाले असले, की गोपीचंद काही दखलपात्र नाहीत, तरीही ते जिल्ह्यातील भाजपच्या असंतोषाचे जनक ठरले आहेत. 
भाजपमधील या संघर्षामागे अनेक कारणे आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांपेक्षा सांगलीतील भाजपचा फरफॉर्मन्स अधिक चांगला असतानाही पहिल्यांदा जिल्ह्याला भाजपने पूर्णवेळ पालकमंत्री दिला नाही. त्यानंतर दिला ते सुभाष देशमुखांचे सारे लक्ष आधी सोलापूरवर असते. वेळ मिळाला तर ते सांगलीचे आपण पालक आहोत, याची त्यांना आठवण होत असते. या सर्व कारणांमुळे ज्या प्रमाणात प्रशासन गतिमान होणे अपेक्षित आहे, ते येथे झालेच नाही. पडळकरांनी आता खासदारांना अंगावर घेतले आहे. ते सध्या धनगर समाजाच्या आरक्षणावर स्वार झाले आहेत. म्हणजेच त्यांचा नेक्‍ट प्लॅन तयार असणार आहे. भविष्यात ते अन्य पक्षांत गेले तर भाजपकडे दुसरा धनगर समाजाचा नेता आज तरी कोणी दिसत नाही. त्यामुळे पडळकरांना असे अदखलपात्र करणे खासदारांना आणि भाजपलाही परवडणारे नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com