हाउसफुल्ल गर्दी अन्‌ उलाढालही...!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत आजअखेर सुमारे अठरा लाखांवर भाविकांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. रविवार सुटीचा दिवस 
आणि पुढे सलग तीन दिवस सुट्या असल्याने आजपासून गर्दीने उच्चांक गाठला आहे. 

आज पहाटे अडीचपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या. पुरुषांची रांग शिवाजी पुतळ्यापर्यंत तर महिलांची भवानी मंडपापर्यंत गेली.

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत आजअखेर सुमारे अठरा लाखांवर भाविकांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. रविवार सुटीचा दिवस 
आणि पुढे सलग तीन दिवस सुट्या असल्याने आजपासून गर्दीने उच्चांक गाठला आहे. 

आज पहाटे अडीचपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या. पुरुषांची रांग शिवाजी पुतळ्यापर्यंत तर महिलांची भवानी मंडपापर्यंत गेली.

सायंकाळनंतर मात्र मुख्य दर्शन रांगेपेक्षा मुख दर्शनाची रांगच भली मोठी लागली. दरम्यान, या निमित्ताने उलाढालही वाढली असून हॉटेल व यात्री निवासातही गर्दी वाढली आहे. शहरातील विविध हॉटेलबरोबरच महालक्ष्मी धर्मशाळा व ब्राह्मण सभेच्या धर्मशाळेतही कमी शुल्कात सोय आहे. त्यामुळे त्या ठिकाणांसह शहरातील हॉटेलमध्येही बुकिंग फुल्ल आहे.

महालक्ष्मी मंदिरासह भवानी मंडप, रंकाळा तलाव या परिसरात झालेल्या पर्यटकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन छोट्या विक्रेत्यांनीही त्याच परिसरात लक्ष केंद्रित केले आहे. 

श्री महालक्ष्मी, जोतिबा दर्शन आणि पन्हाळगडाची भ्रमंती, अशी सेवाही या निमित्ताने काही पर्यटन संस्थांनी उपलब्ध केली आहे. मंगळवार (ता. ११) व बुधवारी (ता.१२) दसरा आणि मोहरमच्या सार्वजनिक सुट्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उद्या (सोमवारी) सुट्या जाहीर केल्या आहेत, तर ज्या ठिकाणी सुटी नाही, अशांनी रजा टाकून पर्यटनावर भर दिला आहे.

निवडणूक फिव्हर
कोल्हापूरसह राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची धूम आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर आता इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, त्यांनी खासगी वाहनांतून नवदुर्गा सहलींचे आयोजन केले आहे. त्याशिवाय मुंबई महापालिकेची निवडणूकही येत्या काळात असल्याने मुंबईतूनही मोठ्या संख्येने भाविकांना घेऊन येणाऱ्या खासगी बसेसची संख्या वाढली आहे. 

नवरात्रोत्सव, सलग सुट्या आणि त्यातही रविवार असल्याने भाविकांची गर्दी वाढणार, हे लक्षात घेऊन श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने नेटके संयोजन केले. उत्सवात आजअखेर सत्तर हजारांवर तर आज एका दिवसात आठ हजारांवर भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला.
- राजू मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी अन्नछत्र

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देशभरातून कोल्हापुरात भाविक येत असून, कोल्हापुरी चपलांना मागणी वाढली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत छोट्या व्यावसायिकांचा व्यवसायही तेजीत आहे. अशीच स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्‍यता आहे.
- महादेव ऱ्हाटणकर, चप्पल व्यावसायिक

‘व्हीआयपी’ तिढा कायम
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून व्हीआयपी प्रवेश वादाचा ठरला आहे. देवस्थान समितीने आज सुटीमुळे गर्दी वाढणार असल्याने कुणालाही व्हीआयपी प्रवेश देणार नाही, असे जाहीर केले; मात्र तरीही काही घटकांनी अनेकांना व्हीआयपी दर्शन घडवले. 

बाजारपेठेत गर्दी...
खंडेनवमीच्‍या पार्श्वभूमीवर आज ऊस, झेंडूची फुले, लव्‍हाळा खरेदीसाठी बाजारात लगबग होती. महालक्ष्‍मी मंदिर परीसर, बिंदू चौक, शिंगोशी मार्केट येथे गर्दी झाली होती.