ग्राहक वाढले... चोर घटले!

ग्राहक वाढले... चोर घटले!

वीज गळतीबाबत सांगलीचा राज्यात वरचा नंबर लागत होता. आकडे टाकून चोरी, मीटरमध्ये फेरफार, चुकीचे रीडिंग, मीटर नसलेले पंप अशा अनेक अडचणी होत्या. गेल्या चार वर्षांत यामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यात आली. चोरांना ग्राहक बनवले अन्‌ गळतीही कमी करण्यात यश मिळविले. परिणामी जिल्ह्याला अखंड वीज देणे शक्‍य बनले आहे. 
 

सांगली जिल्ह्यात सन २०११-१२ ला वीजगळती २०.८९ टक्के इतकी होती. लघुदाब वाहिनीवर हे प्रमाण २९.१९ टक्के इतके होते. ते चालू वर्षात सरासरी १६ टक्के तर लघुदाब वाहिन्यांवर २१.९ टक्के इतके कमी करण्यात यश मिळाले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आणि यश मिळाले, असे अधीक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

विजेची गळती ही केवळ महावितरणसाठी चिंतेची बाब नव्हती, सर्वसामान्य ग्राहकांनाही या गळतीचा, चोरीचा भुर्दंड सहन करावा लागायचा. विजेची दरवाढ आणि भारनियमनाचे संकट हे त्याचेच द्योतक होते. त्यात मोठी सुधारणा करण्यात आली आहे. हे एका दिवसात शक्‍य झालेले नाही.

त्यासाठी महावितरणने फिडर सेपरेशनची मोहिमच राबवली. विजेचा दाब नियंत्रित करण्यासाठी ट्रान्स्फॉर्मरची संख्या वाढवली. कृषी पंपांना मीटर बसवले. आता २ लाख ४१ हजार कृषी पंपांपैकी केवळ ३५ हजार पंप मीटरशिवाय आहेत. येत्या तीनएक महिन्यात तेही मीटरशी जोडले जाणार आहेत. 

वीज बिलावर रीडिंगचा फोटो नसतो, अशी ग्राहकांची तक्रार होती. त्यात सुधारणा करण्यासाठी महावितरणने नवी सोय केली आहे. त्यानुसार रीडिंग घेणारी व्यक्ती फोटो काढला की तो थेट ग्राहकाच्या खात्यावर त्याच जागेवरून पाठवू शकते. हीच सोय ग्राहकांसाठीही उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय, मोबाइल नंबरची नोंदणी केल्यास त्यावरही बिलाची माहिती पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. 

महावितरणने वीजगळती शोधली, चोरांविरुद्ध कारवाई केली तरी फार फरक पडत नव्हता. त्याऐवजी चोरीची वेळच येऊ नये, असे धोरण गेल्या काही काळात राबवले गेले. परिणामी, ग्राहक वाढले आणि चोर संपले, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वीज हा विषय बहुतांश लोकांशी निगडित आहे. गळती कमी होण्याचा अर्थ सर्वांच्या बिलांवरचा ताण कमी होणे, असाच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com