सायबर धोका उंबरठ्यावर

Cyber-Crime
Cyber-Crime

कोल्हापूर - बॅंक व्यवहार, ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावर होणारी बदनामी, मार्केटमधील वेगवेगळे ॲप यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केले जाणारे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘सायबर दरोडा’ही घातला जाऊ शकतो, हे आता कॉसमॉस बॅंकेतून ९४ कोटी लुटल्यानंतर उजेडात आले. अशी फसवणूक टाळण्यासाठी, बदनामी टाळण्यासाठी ग्राहक, बॅंकांनीही सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. अशा तक्रारींच्या निवारणासाठी पोलिसांनी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे सुरू केले आहे. तरीही काही प्रकरणे सोडविण्यावर मर्यादा येत आहेत.

एखाद्या परिचित व्यक्तीचे नाव तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आले, तर तुम्ही बिनधास्त कॉल घेता आणि बोलताही. मात्र असे करताना त्या व्यक्तीचा आवाज वेगळा वाटला तर कॉल बंद करा. कारण केवळ साडेतीनशे रुपयांत ‘कॉल फ्रॅन्कर’ ॲपच्या सहाय्याने असे दहा कॉल करता येतात. यात तुमच्या मोबाईलवर येणारा कॉल हा तुमच्या परिचित व्यक्तीचा असल्याचे दाखविले जाते. प्रत्यक्षात दुसरीच व्यक्ती तो कॉल हॅक करून बोलते. ही फसवणुकीची पद्धत कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत यापूर्वी वापरली आहे. एका महिलेची बदनामी करण्यात आली.

प्रॉग्झी सर्व्हरचा वापर करून इंटरनेटवर धमकी देणे, ब्लॅकमेलिंग करणे, बक्षीस लागले आहे, ऑनलाईन पैसे भरा, असे सांगून फसवणूक होऊ शकते. पुण्यातील एका उच्चभ्रू कुटुंबातील तरुणाने अतिरेक्‍यांना याच पद्धतीने मदत केली होती. त्याला अटक झाली. कोल्हापुरात अंबाबाई मंदिर, भवानी मंडप परिसरात आलेल्या महिलांची छायाचित्रे घेऊन ती ठराविक साईटवर अपलोड केली जात होती. कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, मुंबई येथे अशा पद्धतीचे गुन्हे घडले आहेत. 

आर्थिकच नव्हे, तर बदनामीच्या गुन्ह्यातही सायबर क्राईमचा वापर दिसून येतो. सहा महिन्यांपूर्वी डॉक्‍टरांची शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाली. कोणी फसवणूक केली, याचा अंदाज असूनही शाहूपुरी पोलिस अद्यापही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. यावरून गुन्ह्यात पोलिसही हतबल होत असल्याचे दिसून येते. आर्थिकबरोबरच बदनामीच्या गुन्ह्यांबाबत फिर्यादी सावध भूमिकाच घेतो. भविष्यात त्रास नको म्हणून फिर्यादीही पुढे येत नसल्याची उदाहरणे पोलिसांकडे आहेत. नायजेरियन फ्रॉडद्वारेही तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा फसवणुकीत तुम्हाला आलेले कॉल परदेशातून आल्याचे दिसते. प्रत्यक्षात हे कॉल देशातीलच एखाद्या शहरातून केले जातात. अकाऊंटवर पैसे भरा, तुम्हाला दुप्पट रक्कम मिळेल, बक्षीस लागले आहे, अशा फसवणुकीत अनेक सर्वसामान्य गुरफटले जातात. अशाच गुन्ह्यातून कागलमध्ये एका व्यक्तीने घर व मालमत्ता विकली आणि पुढे आत्महत्याही केली. त्यामुळे सावधान राहूनच आपली फसवणूक टाळणे हे महत्त्वाचे आहे.

व्हॉटस्‌ॲप वापरताय? सावधान!
वेब स्कॅनद्वारे तुमचा व्हॉटस्‌ॲप दुसऱ्याकडून स्कॅन करता येऊ शकतो. त्यातून तुम्ही कितीही दूर असला तरीही तुमच्या व्हॉटस्‌ॲपवर काय मजकूर आहे, तुम्ही तो कोणाला शेअर करता याची माहिती संबंधित व्यक्तीला मिळू शकते. म्हणून तुमचा मोबाईल हॅंडसेट शक्‍यतो दुसऱ्याकडे देऊच नका, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com