सहकार वाचवण्यास दादांचा मंत्र घ्या 

सहकार वाचवण्यास दादांचा मंत्र घ्या 

सांगली - सहकारी चळवळ पूर्वीसारखी राहिली नाही. कारखाने मोडून सहकार कसा वाचणार? सहकारी चळवळ वाचवायची, तर वसंतदादांच्या विचाराने काम करावे लागेल. त्यांचे विचार राज्याला प्रगतीवर नेल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आज येथे केले. त्यांच्या हस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल, स्वातंत्र्य सेनानी वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ आज झाला. 

कृष्णा नदीतीरावरील वसंत स्फूर्तिस्थळ या दादांच्या समाधीस्थळी आज अभिवादनासाठी श्री. पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, शिवाजीराव देशमुख, आमदार पतंगराव कदम, आमदार सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, कमलताई व्यवहारे यांनी उपस्थिती लावली. 

समाधीस अभिवादन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शिवराज पाटील म्हणाले, ""केवळ शेती करून इतर देशांशी स्पर्धा करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर वसंतदादा, बाळासाहेब विखे-पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांनी औद्योगिकीकरणाची चळवळ सुरू केली. त्याचवेळी सहकारी चळवळही सुरू झाली. मात्र, ही चळवळ पूर्वीसारखी राहिली नाही. साखर कारखाने, सूत गिरण्या उभ्या केल्या; पण त्या चालत नाहीत. या संस्था चांगल्या चालवणे ही दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. सहकारी चळवळ मोडली तर काळा पैसा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी ही चळवळ पुन्हा उभारावी लागेल. दादांनी कधी धर्म, जातीच्या नावावर काही केले नाही. त्यांच्याबद्दल आजही राजस्थानमध्ये आदराची भावना आहे. त्यांना इंग्रजी, हिंदी भाषा येत नसताना त्यांनी लोक जोडले. त्यामुळे दादा कुणाला परके वाटले नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून त्यांनी मार्केट कमिट्यांची निर्मिती केली.'' 

वसंतदादा जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले, ""वसंतदादांनी राज्याला वेगळी दिशा देण्याचे काम केले. दादांसारखे नेतृत्व राज्याला दिल्याबद्दल सांगलीकरांचे आभार. उपेक्षित भागाला मदत करण्याची दादांची भूमिका होती. कमी शिक्षण असतानाही त्यांनी कल्पकतेतून सहकारी चळवळीतून सामान्य माणूस उभा करण्याचे काम केले. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान विसरता येणार नाही.'' 

अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी म्हणाले, ""इंदिरा गांधी अध्यक्ष असताना दादा महासचिव होते. त्यांचे गुण, आचरण नव्या पिढीने स्वीकारावेत आणि आचरणात आणावेत असे होते. दादांचे दार आणि मन सर्वांसाठी खुले होते. ते कमी बोलत; पण निर्णय आणि कामातूनच जास्त बोलत.'' 

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ""राज्याच्या विकासाचा मजबूत पाया घातला गेला, त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादांना द्यावे लागेल. सहकारी क्षेत्राला निर्णायक वळण देण्याचे काम दादांनी केले. विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी जी शैक्षणिक क्रांती केली ती दादांमुळेच.'' 

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ""मी दुसऱ्या राजकीय गटात होतो. मात्र वसंतदादांनी मुख्यमंत्री झाल्यावर मला बोलावून अर्थमंत्री केले. महाराष्ट्र त्यांना कधी विसरणार नाही. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू कण्यास नकार दिल्यानंतर दादांनी ही महाविद्यालये काढणारच, असे ठणकावून सांगितले.'' 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ""ज्या क्षेत्रात काम केले तेथे दादा यशस्वी झाले. मुख्यमंत्री म्हणून दादांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारक ठरले.'' 

पतंगराव कदम म्हणाले,""दादांनी सहकारात आदर्श काम केले. आज सहकारात काम करणाऱ्यांनी चिंतन, मनन करण्याची गरज आहे.'' 

नारायण राणे म्हणाले, ""वसंतदादांनी कॉंग्रेस पक्ष वाढवला, सत्तेपर्यंत पोहोचवला.'' 

स्वागत करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, ""शेतकरी वाचवा, सहकार वाचवा ही संकल्पना घेऊन सर्व महाराष्ट्रात दादांच्या जन्मशताब्दीचे कार्यक्रम होणार आहेत. दादांच्या मार्गावरूनच आजही राज्य चालत आहे.'' 

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माणिकराव ठाकरे यांनीही दादांबद्दल आठवणींना उजाळा दिला. यावेळी श्रीमती शैलजा पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस यशवंत हाप्पे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

"प्रतीकनी वारसा चालवावा' 

अशोक चव्हाण म्हणाले, ""वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांनी दादांचा वारसा सांभाळावा, तर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी मोठ्या भावाप्रमाणे सांभाळावे.'' श्री. चव्हाण यांनी हे विधान करून दादा, कदम घराण्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादाला तिलांजली द्यावी आणि एकत्र यावे असाच संदेश वसंतदादा जन्मशताब्दीच्या व्यासपीठावरून दिला, अशी चर्चा सुरू होती. 

इंदिराजींचीही जन्मशताब्दी 

सहा दिवसांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. एकाच महिन्यात कॉंग्रेसच्या दोन कर्तृत्ववान नेत्यांची जन्मशताब्दी सुरू होत असल्याने राज्य, देशभरात कार्यक्रम राबवणार आहेत. दोघांनीही पक्षाला, देशाला, राज्याला दिलेल्या योगदानाची आठवण ठेवून त्यांच्या कार्याची ऊर्जा, स्फूर्ती नवीन कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी महोत्सव घेणार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

राज्य सरकार कोते 

राज्य सरकाने दादांची जन्मशताब्दी साजरी केली नाही, याविषयी श्री. विखे-पाटील म्हणाले, ""कोत्या मनाने राज्य करता येत नाही. वसंतदादांची जन्मशताब्दी राज्य सरकारने करण्याची गरज होती. दादा कोणत्या एका पक्षाचे नव्हते, तर राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले होते.'' 

"छद्मी राजकारण सोडावे' 

पतंगराव कदम म्हणाले, ""आजच्या कार्यक्रमानिमित्त सांगलीत कॉंग्रेस बळकट झाली, की राज्यात आणि देशातही होईल. मात्र त्यासाठी छद्मी राजकारण सोडून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी विनंती करतो.'' 

कमी शिक्षण असूनही... 

दादा कमी शिकले होते, असा उल्लेख अनेक वक्‍त्यांनी केला. मात्र, शिक्षण कमी असूनही त्यांनी ज्या दूरदृष्टीने सहकार चळवळ, शैक्षणिक संस्था सुरू करणे, सिंचन योजना सुरू करणे, तसेच लोक जोडण्याची कला याबद्दल अनेकांनी गौरवोद्गगार काढले. शिवराज पाटील म्हणाले, ""छत्रपती शिवरायांप्रमाणेच वसंतदादांबाबत दादांचे कैसे विचार करणे, दादांचे कैसे चालणे, दादांची कैसी सलगी करणे हे लक्षात घेऊन आचरणाची गरज आहे.'' 

श्री. द्विवेदी म्हणाले, ""हिंदीत पढा नहीं है लेकीन कढा है अशी म्हण आहे. तसे दादा होते शिकलेले नसले तरी ते द्रष्टे होते.'' 

जेलफोडोत सहभागी जयराम कुष्टेंचा सत्कार 

वसंतदादांनी 1943 मध्ये केलेल्या जेल फोडो आंदोलनात त्यांच्यासोबत 14 सहकारी होते. त्यांपैकी हयात असलेले एकमेव साक्षीदार जयराम कुष्टे यांचा शिवराज पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत हृद्य सत्कार झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com