बंधाऱ्यांतून हरितक्रांतीकडे वाटचाल

रूपेश कदम
बुधवार, 25 एप्रिल 2018

मलवडी - पडणाऱ्या पावसाचा थेंब न्‌ थेंब अडविण्यासाठी विविध उपाययोजना आकारास आल्या. त्यातीलच महत्त्वाची योजना म्हणजे साखळी सिमेंट बंधारे. त्यानंतर आली ती माणगंगा पुनरुज्जीवन व जलयुक्त शिवार योजना.

मलवडी - पडणाऱ्या पावसाचा थेंब न्‌ थेंब अडविण्यासाठी विविध उपाययोजना आकारास आल्या. त्यातीलच महत्त्वाची योजना म्हणजे साखळी सिमेंट बंधारे. त्यानंतर आली ती माणगंगा पुनरुज्जीवन व जलयुक्त शिवार योजना.

माणमध्ये २००९ साली आमदार झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असल्याचा पुरेपूर फायदा मतदारसंघासाठी करून घेतला. यापूर्वी सिमेंट बंधारे बांधले जायचे पण एखाद-दुसऱ्याचाच फायदा व्हायचा. त्यामुळे ओढ्यांवर एकापाठोपाठ एक असे चार-पाच किंवा त्यापेक्षाही जास्त बंधारे बांधण्याची संकल्पना पुढे आली. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठून तो भाग सुजलाम-सुफलाम होण्यास मदत झाली.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार गोरेंच्या मागणीवरून माणमध्ये साखळी सिमेंट बंधाऱ्यांचा पायलट प्रोजेक्‍ट राबविला. त्यासाठी दहा कोटी रुपये निधीची तरतूद केली तसेच आणखी २७ कोटींचा निधी उपलब्ध करून ४० गावांमध्ये हा प्रोजेक्‍ट राबविण्यात आला. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाई दूर होऊन हरितक्रांती झाली. माणगंगेवर जुने १८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होते, पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता. हे बंधारे सिमेंट बंधाऱ्यात रुपांतरित करण्यात तत्कालीन जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. या कामाची सुरवात माणगंगा नदीवरील भांडवली येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या पुनरुज्जीवनाने झाली. मलवडीच्या अस्तित्व शैक्षणिक व सामाजिक संस्थेने लोकसहभागातून या बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन केले.

पिण्याच्या पाण्याची टंचाई होती तेथे शेतीला पाणी उपलब्ध करू शकलो, याचा आनंद आहे. अगदी कमी खर्चात राबवलेला हा प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरला.
 - आमदार जयकुमार गोरे

Web Title: dam Green Revolution water storage