शिळोप्याच्या गप्पांमधून साकारले बंधारे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

खर्शी तर्फ कुडाळच्या युवकांचे श्रमदान; दोन बंधारे पूर्ण, चार उभारण्याचा मानस

सायगाव - आजचे युवकांना मोबाईलने अक्षरशः वेड लावले आहे. मोबाईल हातात असला, की त्यांना कशाचेही देहभान राहात नसल्याचे दिसत आहे. मात्र, खर्शी तर्फ कुडाळमधील जिद्दी युवकांनी हा समज फोल ठरवत रात्री शिळोप्याच्या गप्पा मारताना मनात आलेले विचार दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात आपल्या कामातून उतरवून जिद्दी काय असते हे दाखवून दिले आहे.

खर्शी तर्फ कुडाळच्या युवकांचे श्रमदान; दोन बंधारे पूर्ण, चार उभारण्याचा मानस

सायगाव - आजचे युवकांना मोबाईलने अक्षरशः वेड लावले आहे. मोबाईल हातात असला, की त्यांना कशाचेही देहभान राहात नसल्याचे दिसत आहे. मात्र, खर्शी तर्फ कुडाळमधील जिद्दी युवकांनी हा समज फोल ठरवत रात्री शिळोप्याच्या गप्पा मारताना मनात आलेले विचार दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात आपल्या कामातून उतरवून जिद्दी काय असते हे दाखवून दिले आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांमधील अनेक गावे ही आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी श्रमदानातून जलसंधारणाची कामे करताना दिसत आहेत. त्याचा आदर्श घेऊन खर्शी तर्फ कुडाळच्या युवकांनी पाण्यासाठी दर रविवारी श्रमदानातून ओढ्यावर बंधारे बांधण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत या युवकांनी दोन बंधारे पूर्ण करून आपल्या गप्पांतून निर्माण झालेले विचार प्रत्यक्षात उतरविले असल्याने या युवकांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

खर्शी तर्फ कुडाळ गावाजवळून धोमचा कालवा गेलेला आहे, तरीदेखील उन्हाळ्यात गावाच्या पाणीपुरवठा विहिरीचा जलस्रोत कमी होऊन गावाला पिण्याचे पाणी कमी पडते. कालव्याला पाणी असेल तेव्हा ओढे भरून वाहतात. 

मात्र, कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर मात्र, हेच ओढे पूर्ण कोरडे पडतात. अशा वेळी पाणीपुरवठा विहिरीची पाणीपातळी खालावते व गावाला पिण्याचे पाणी कमी पडते. गेल्या वर्षी ही समस्या अनुभवल्यामुळे गावचे पोलिस पाटील सुहास भोसले, युवक शिक्षक संदीप किर्वे, प्रमोद दीक्षित यांनी रात्रीच्या वेळी गप्पा मारताना युवकांसमोर विहिरीलगत बंधारे बांधण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार गावातील युवकांनी दर रविवारी कामातून वेळ काढून चार तास श्रमदान करण्याचे ठरवले. विहिरीच्या वरील बाजूला सिमेंटच्या पोत्यांमध्ये वाळू भरून मजबूत भराव करण्यासाठी गावातीलच धैर्यशील भोसले, समाधान भोसले, सतीश भोसले, राहुल शिवणकर, नीलेश शिवणकर, डॉ. विशाल भोसले, रवींद्र शिवणकर, महेश शेंडे, मुकेश सोनटक्के, प्रकाश भोंडे, सचिन साळुंखे, तुषार भोसले या युवकांनी श्रमदान करण्यास सुरवात केली. आतापर्यंत त्यांनी दोन बंधारे पूर्ण केले असून, असेच दर रविवारी श्रमदानातून चार बंधारे बांधण्याचा मानस या युवकांचा आहे.

उन्हाळ्यात कालव्याला दहा दिवस पाणी सोडल्यानंतर विहिरीची पाणीपातळी बऱ्यापैकी टिकून राहायची. मात्र, कालव्याचे पाणी गेल्यानंतर पुढे महिनाभर पाणीपातळी कमी होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण व्हायची. त्यामुळे या युवकांनी या विहिरीच्या वरील बाजूस बंधारा बांधल्यामुळे पाणी अडवून साठून राहिल्यामुळे पाणीपुरवठा विहिरीसह इतर विहिरींचीही पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होत आहे.
- सुहास भोसले, पोलिस पाटील, खर्शी तर्फ कुडाळ