घातक माव्याची ‘पार्सल’ सेवा

घातक माव्याची ‘पार्सल’ सेवा

कोल्हापूर - पंधरा रुपयाला एक पुडी, त्या पुडीत कडक मावा, हा मावा कडक बनवण्यासाठी म्हणजेच लवकर ‘किक’ बसण्यासाठी या माव्यात घातक अमली पदार्थांचा वापर... अशा पुड्या पुरवणारी एक मोठी साखळीच शहरात तयार झाली आहे. हा मावा हाताने मळू शकणार नाही, इतके त्याचे उत्पादन असल्याने मावा एकजीव करण्यासाठी यंत्र तयार झाले आहे. वडणगे, आंबेवाडी परिसरात आडबाजूला त्याचे केंद्र आहे आणि शहरात विविध ठिकाणी हा मावा पोहोचवणारी यंत्रणा कार्यरत आहे.

कोल्हापुरात अगदी उघडपणे निवृत्ती चौक, लक्ष्मीपुरी, ट्रेझरी, उमा टॉकीज, बुरूड गल्ली ते जोशी गल्ली रस्ता, फोर्ड कॉर्नर, पंचगंगा शिवाजी पूल, शिवाजी पेठ परिसरात अशा घातक माव्याची विक्री चालू आहे. तरुण पिढी त्याच्या अधीन झाली आहे. दिवसभर याच माव्याच्या धुंदीत राहणाऱ्या या तरुणांना तोंडाचा कॅन्सर होणार हे स्पष्ट आहे आणि एकदा कॅन्सरने गाठले की, त्यातच त्यांचा शेवट होणार आहे. याउलट मावा विक्रेते असले विष विकून गब्बर झाले आहेत. म्हणेल त्या दरात कोठेही दुकानगाळा भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी त्यांच्यात चढाओढ आहे.

तंबाखूत अन्य कोणतीही सुपारी किंवा घातक द्रव्य घालून त्याचे मिश्रण करून विकण्यास कायद्याने बंदी आहे. या घातक मिश्रणाची गोळी तोंडात धरली की एक प्रकारची नशा चढते. मावा शौकिनांच्या भाषेत हळूहळू किक बसते व त्याच्या अंमलाखाली राहिले की आपण जगापासून अलिप्त असे वाटू लागते. काही अंशी हे खरे असते. कारण माव्यातील घातक द्रव्यांमुळे मेंदू बधिर होण्यास सुरवात झालेली असते. आणि एकदा या माव्याची चटक लागली की ती रोखणे केवळ अशक्‍य असते. प्रसंगी चोऱ्या करून मावा खरेदी करेपर्यंत शौकिनांवर वेळ येते. शरीराला तर अशा घातक सवयीने घेरले जाते की, दिवसाची सुरवात मावा तोंडात धरून करावी लागते आणि मावा खाणाऱ्याच्या आयुष्याचा शेवट कॅन्सरच्या उपचारात होऊन जातो.

माव्याचे व्यसन पसरवण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. हे मावा विक्रेते व त्यांची ठिकाणे शोधून काढण्यात कसलीही अडचण नाही. अन्न औषध प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची कमी आहे हे खरे आहे. पण शहरातील ठराविक चौक व ठराविकच पान विक्रेते यांच्या दुकानासमोर सापळा रचला तर तासाभरात एका वेळी सर्वांवर कारवाई करता येणार आहे. सहजासहजी त्यांना जामीन मिळणार नाही अशी कलमे लावून कारवाई झाली तरच त्यांची मावा विक्री व कमाई थांबणार आहे. त्याहीपेक्षा तरुण पिढी कॅन्सरच्या विळख्यातून सुटणार आहे.

भर चौकात विक्री
गंभीर परिणाम असणाऱ्या या माव्यावर शासनाने जरूर बंदी आणली आहे. पण ही बंदी झुगारून मावा विकणारे आपल्याला कोण काही करू शकत नाही, याच आविर्भावात आहेत. त्यामुळेच भर दिवसा भर चौकात माव्याच्या पुड्या विकण्याचे धाडस व गुर्मी त्यांच्यात आहे. आपण कोल्हापुरातली बहुजन समाजाची तरुण पिढी व्यसनाधीन करत आहोत, कॅन्सरग्रस्त करत आहोत याचा त्यांना खेद नाही. खंतही नाही. पण मावा विकून पैसा मिळवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आता तर त्यांनी ठिकठिकाणी पार्सल सेवा सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com