दरिबडचीतील मायलेकीच्या खूनप्रकरणी आरोपी दोषी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

मंगळवारी निकाल - अनैतिक संबंधांतून चुलत दिराने केला खून

मंगळवारी निकाल - अनैतिक संबंधांतून चुलत दिराने केला खून
सांगली - अनैतिक संबंधांतून चुलत भावजय व चिमुकल्या पुतणीचा डोक्‍यात हातोडा मारून दरिबडची (ता. जत) येथे निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी चिदानंद हणमंत कोन्नूर (वय 28, रा. तिकोटा, जि. विजापूर) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांनी आज दोषी ठरवले. मंगळवारी (ता. 24) याबाबतचा निकाल दिला जाणार आहे. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.

अधिक माहिती अशी, तिकोटा येथील मड्याप्पा रामू कोन्नूर याचा दहा वर्षांपूर्वी अनिता हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना वैष्णवी व ऋतिक ही दोन अपत्ये होती. मड्याप्पा व अनिता वाट्याने शेती करत होते. मड्याप्पाचा चुलत भाऊ चिदानंद हा त्यांच्या शेतात ट्रॅक्‍टरने नांगरणीचे काम करत होता. चिदानंद आणि अनिता यांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. 2014 मध्ये अनिता ही चिदानंदबरोबर पळून गेली. पती मड्याप्पा व आई कस्तुरी यांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. 15 दिवसांनंतर अनिता पुन्हा पतीकडे आली. माफी मागून पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे पंचासमक्ष कबूल केले. 15 दिवस राहिल्यानंतर अनिता मुलगी वैष्णवी (वय 4) हिला घेऊन चिदानंदकडे गारगोटी येथे राहायला गेली. काही दिवसांनंतर तिने आईला फोन करून गारगोटी येथे बोलावून घेतले. तिच्या आईने पतीकडे नांदायला जा, असे सांगूनही ती गेली नाही.

थोड्या दिवसांनंतर अनिताला मुलगा ऋतिकची आठवण झाली. त्यामुळे तिने "पतीकडे सोड', असा चिदानंदकडे तगादा लावला. चिदानंदला दारूचे व्यसन होते. अनिताच्या तगाद्यामुळे दारू पिऊन तो तिला शिवीगाळ व मारहाण करू लागला. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे ती पुन्हा येणार नाही, असे म्हणत असल्यामुळे चिदानंदला राग आला होता. पतीकडे गेल्यानंतर ती पुन्हा येणार नाही म्हणून तिचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. तिला पतीकडे सोडण्याचा बहाणा करून दुचाकीवरून दरिबडची येथे नेले. तेथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील जंगलात डोंगराजवळ अनिता आणि वैष्णवीला हातोड्याने मारून त्यांचा निर्घृण खून केला.

6 जून 2014 रोजी ग्रामस्थांना जंगलात दोन मृतदेह दिसले. त्यानंतर जत पोलिस ठाण्यात माहिती कळवल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस पथके रवाना केली. त्यानंतर मृत मायलेकी कर्नाटकातील तिकोटा येथील असल्याचे स्पष्ट झाले. तपासात चिदानंदचे नाव निष्पन्न झाल्यानंतर 9 जूनला त्याला अटक केली.

जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी खटल्यात 9 साक्षीदार तपासले. मृत अनिताची आई, वैद्यकीय अधिकारी, चिदानंदला दारू देणारा दुकानदाराचा जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्यानुसार चिदानंदला दोषी ठरवले. निकालासाठी मंगळवारी तारीख दिली आहे.

Web Title: Daribadachi murder case accused guilty