दत्त महाराज तालमीची सीपीआरला मदत

सुधाकर काशीद
गुरुवार, 27 एप्रिल 2017

कोल्हापूर - पापाची तिकटी येथील दत्त महाराज तालीम मंडळाचे काही कार्यकर्ते सीपीआर इस्पितळात गेले होते. बालरुग्ण विभागात दोन बालके अत्यवस्थ होती. त्यांच्या छातीत कफ साचला होता. तो तातडीने बाहेर काढणे आवश्‍यक होते. त्यासाठी जे एक उपकरण असते, ते बालरुग्ण विभागात उपलब्ध नव्हते. 

कोल्हापूर - पापाची तिकटी येथील दत्त महाराज तालीम मंडळाचे काही कार्यकर्ते सीपीआर इस्पितळात गेले होते. बालरुग्ण विभागात दोन बालके अत्यवस्थ होती. त्यांच्या छातीत कफ साचला होता. तो तातडीने बाहेर काढणे आवश्‍यक होते. त्यासाठी जे एक उपकरण असते, ते बालरुग्ण विभागात उपलब्ध नव्हते. 

बालक तर अत्यवस्थ होते. त्यामुळे इकडे तिकडे धावपळ करून दुसऱ्या वॉर्डातून ते उपकरण आणण्यात आले व त्या बालकावर पुढचे उपचार सुरू झाले... कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रसंग चांगलाच घर करून राहिला. त्यांनी ठरवले. आपण ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या परीने काही तरी करायचे. आणि हे करण्यासाठी शिवजयंती हा त्यांना चांगला मुहूर्त मिळाला आणि त्यांनी सीपीआरमधील बालरुग्णाच्या विभागासाठी उपचाराची उपकरणे देऊन शिवजयंती सोहळ्याचा एक नवा पायंडा पाडला. लहान मुलांना सर्दी, कफ, छाती भरण्याचा विकार होतो. अशा वेळी कफ बाहेर काढण्यासाठी काही उपकरणांचा वापर अत्यावश्‍यक असतो. ही उपकरणे आता सीपीआरला मिळणार असल्याने उपचार अधिक सुलभ होऊ शकणार आहेत.

शिवजयंती हा खूप मोठा सोहळा आहे. पण शिवजयंतीचे स्वरूप काही ठिकाणी बदलत चालले आहे. त्याला झगमगाट, जल्लोषाचे स्वरूप आले आहे. या परिस्थितीत दत्त महाराज तालीम मंडळाने शिवजयंतीला सामाजिक जाणिवांची जोड देत एक आशादायक चित्र निर्माण केले आहे.
शिवजयंतीला डॉल्बीचा दणदणाट हा काही मंडळांनी ‘पायंडा’ पाडला आहे. पण दत्त महाराज तालीम मंडळाने कायम पारंपरिक वाद्यावर भर ठेवला आहे. पारंपरिक वाद्ये जिवंत राहावीत म्हणून ढोल, ताशा, ढोलकी, हलगी वादनाची स्पर्धा घेतली आहे.  यावर्षी गुरुवारी लेझीमची स्पर्धा घेण्यात येणार आहे. लेझीमचा ताल, लेझीममुळे मिळणारा व्यायाम व लेझीम पथकामुळे एखाद्या सोहळ्याची वाढणारी उंची, या हेतूने त्यांनी लेझीम स्पर्धा भरवली आहे. उद्या सायंकाळी सात वाजता पापाची तिकटीजवळ ही स्पर्धा होणार आहे. लेझीमचे जिल्ह्यातील १७ संघ सहभागी झाले आहेत.

दत्त महाराज तालीम मंडळाने शिवजयंतीला शिवोत्सवाचे स्वरूप दिले आहे. शिवजयंतीसाठी गोळा होणाऱ्या निधीतून त्यांनी शिवकल्याण योजना तयार केली आहे. शिवजयंती म्हणजे केवळ ‘जय भवानी - जय शिवाजी’ असे स्वरूप न राहता त्या निधीतून फार नाही, पण दोन-तीन गरजू कुटुंबांना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. यावर्षी याच निधीतून सीपीआरच्या बालरुग्ण उपचार विभागास उपचाराची उपकरणे दिली आहेत. यावर्षी छत्रपती शिवरायांची हत्तीवर आरूढ मूर्ती एक वेगळे वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराज हत्तीवरील अंबारीत बसले आहेत, अशा स्वरूपाची ही पहिलीच मूर्ती आहे.

Web Title: datt maharaj talim help to cpr hospital