बसखाली चिरडून बाप-लेक ठार

बसखाली चिरडून बाप-लेक  ठार

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ अपघात; स्कूल बसची तोडफोड

प्रयाग चिखली - स्कूल बसखाली चिरडून मोटारसायकलस्वार बाप-लेक जागीच ठार झाले. श्रीपती महादेव गोळे (वय ७२) व त्यांचा मुलगा पंडित (३८, दोघे रा. केर्ले, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. आज सकाळी कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ हा अपघात झाला.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी स्कूल बसची तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला. अपघातात अन्य एक मोटारसायकस्वारही जखमी झाला. याची नोंद करवीर पोलिसांत झाली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - केर्ले येथील श्रीपती गोळे व त्यांची तिन्ही मुले शेती करतात. श्रीपती गोळे आज मुलगा पंडित यांच्याबरोबर कोल्हापुरात नातेवाइकाला पाहण्यासाठी मोटारसायकलवरून जात होते. त्यांनी सोबत काकडीचे गाठोडेही होते. त्याच दरम्यान संजीवनची बस विद्यार्थी घेऊन पन्हाळ्याच्या दिशेने जात होती. सकाळी साडेआठच्या सुमारास रजपूतवाडीजवळ गोळे यांची मोटारसायकल व स्कूल बसचा अपघात झाला. यात गोळे व त्यांचा मुलगा पंडित हे दोघे बसच्या चाकाखाली सापडले.

दोघांच्या डोक्‍यावरूनच बसचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकली. याच अपघातात एका मोटारसायलला धडक बसली. त्यात तरुण जखमी झाला. सुभाष कृष्णात पाटील (वय २८, रा. आळवे, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. ते सोनुर्ले येथील शाळेत संगणक शिक्षक म्हणून काम करतात. ते झेंडूच्या फुलाचे पोते घेऊन कोल्हापूरला येत होते.

अपघातादरम्यान त्याच रस्त्याने येणारे केर्लेतील ग्रामस्थ संपत भोसले यांनी तातडीने अपघाताची माहिती गोळे कुटुंबीय व ग्रामस्थांना दिली. ते लगेच घटनास्थळी आले. हे पाहून बसचालक तेथून पसार झाला. त्यातील विद्यार्थीही दुसऱ्या बसने निघून गेले. संतप्त जमावाने बसवर दगडफेक करून तोडफोड केली. बघ्यांच्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. घटनास्थळी करवीर पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी जखमी पाटील यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवले. येथे नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली . त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आमदार चंद्रदीप नरके यांनी सीपीआरमध्ये येऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली. श्रीपती गोळे केर्ले विकास संस्थेचे आणि रेणुका दूध डेअरीचे संचालक होते. पंडित यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

कठड्यामुळे दुर्घटना टळली
अपघातानंतर स्कूल बस रस्त्याकडेच्या कठड्यावर आदळली, अन्यथा ती रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटण्याचा धोका होता. त्यात विद्यार्थी होते. कठड्यामुळे आणखी एक अनर्थ टळला असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

कष्टकरी गोळे कुटूंब
श्रीपती गोळे यांचे कष्टकरी कुटूंब होते. त्यांना तीन मुलगे होते. त्यातील पंडित हे तिसरे अपत्य होते. पंडीत विवाहित असून  त्यांना सात वर्षाची मुलगी व चार वर्षाचा मुलगा आहे. पंडीत आयटीआयमधून इलेक्‍ट्रीशन होते. ते खासगी नोकरी करत वडिलांना शेतीत मदत करत होते. स्वत:च्या शेतात पिकविलेली काकडी घेऊन शहरात विक्रीसाठी बाप-लेक येत होते.त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com