खोटा धनादेश देऊन 15 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सहा महिन्यांत फिर्यादी चिंता यांना फ्लॅटचा ताबा देणे आवश्‍यक होते. परंतु घनाते याने हा फ्लॅट चिंता यांच्या परस्पर सुधीर ठेंगे व स्वाती ठेंगे यांना 25 लाख रुपयांना विकला.

सोलापूर : ग्राहकाकडून 15 लाख रुपये घेऊन सहा महिन्यांनंतरही फ्लॅटचा ताबा न देता खोटा धनादेश देत फसवणूक केल्याचा प्रकार न्यू पाच्छा पेठ येथे घडला. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात सचिन विठ्ठल घनाते याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणातील फिर्यादी सत्यनारायण सदाशिव चिंता (वय 64, रा. सुखवस्तू, प्लॉट नं. 1, पद्या नगर) यांनी आरोपी सचिन विठ्ठल घनाते (वय 35, रा. 35, 337, न्यू पाच्छा पेठ) याच्याबरोबर न्यू पाच्छा पेठ येथील इस्ट हाउस या ओनरशिप अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 704 हा 20 लाख रुपये किमतीला विकत घेण्याचा व्यवहार ठरविला होता. यातील 15 लाख रुपये चिंता यांनी आरोपी घनाते याला दिले.

सहा महिन्यांत फिर्यादी चिंता यांना फ्लॅटचा ताबा देणे आवश्‍यक होते. परंतु घनाते याने हा फ्लॅट चिंता यांच्या परस्पर सुधीर ठेंगे व स्वाती ठेंगे यांना 25 लाख रुपयांना विकला. तसेच चिंता यांच्या पैशांच्या मोबदल्यात आरोपी घनाते याने सोलापूर जनता सहकारी बॅंक न्यू पाच्छा पेठ शाखा येथील खोटे धनादेश देऊन फसवणूक केली, अशी फिर्याद सत्यनारायण चिंता यांनी दिली. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.