किरणे सरळ जमिनीवर पोचल्याने तापमान वाढ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

कोल्हापूर - शुष्क हवामान, निरभ्र आकाशामुळे सूर्यकिरणे सरळ जमिनीवर पोचल्याने काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली. सध्या कर्कवृत्ताच्या मध्यावर सूर्य असून, कर्कवृत्ताचे अक्षांश हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा येथून गेले आहेत. 

कोल्हापूर - शुष्क हवामान, निरभ्र आकाशामुळे सूर्यकिरणे सरळ जमिनीवर पोचल्याने काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली. सध्या कर्कवृत्ताच्या मध्यावर सूर्य असून, कर्कवृत्ताचे अक्षांश हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा येथून गेले आहेत. 

परिणामी, या राज्यात तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेले. यामुळे उष्ण झालेली ही हवा तीन दिवसांत उत्तर भारत, पश्‍चिम, मध्य भारतातील प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्रात आली. उष्णतेच्या या तीव्र लाटेत महाराष्ट्रात उष्माघातामुळे चार जण मृत्युमुखी पडले. आज कोल्हापुरात अरविंद सुतार या इसमाचाही उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्‍यता पोलिस प्रशासनाने वर्तविली. यामुळे राज्यातील उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूची संख्या पाचवर पोचली आहे. 

शुक्रवारी (ता. 31) सोलापूर जिल्ह्यातील बसाप्पा नागाप्पा (वय 82), जळगाव जिल्ह्यातील भालचंद्र चौधरी, बीड जिल्ह्यातील रुपाताई मिसाळ, सोलापूर जिल्ह्यातील प्रसन्न बिराजदार यांचा उष्माघातात मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. अकोला, औरंगाबादमध्येही उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शासनदरबारी नोंद झाली. गतवर्षी उष्णतेच्या तीव्र लाटेने देशात 700 जणांचे मृत्यू झाले होते. अन्य देशांमध्येही हे प्रमाण जास्त होते. यामुळे 2016 हे जागतिक पातळीवर सर्वाधिक उष्ण ठरले. 

गेल्या आठवड्यात उत्तर आणि पश्‍चिम भारतात निर्माण झालेली उष्णतेची लाट ही मध्य प्रदेशातील उच्च दाबामुळे निर्माण झालेल्या वादळामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा इकडे वळली. यामुळे 29 मार्चला अकोल्यात 44.1 डिग्री सेल्सिअस, तर नागपुरात 43 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. अर्थात, अशी लाट येण्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने मागील आठवड्यात वर्तविली होती. अर्थात उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आलेली ही उष्णतेची लाट नसून, नेहमीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली इतकेच. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तापमानात वाढ झाली असली तरी तांत्रिकदृष्ट्या ती उष्णतेची लाट ठरत नाही, असे हवामान खात्याने स्पष्टीकरण दिले आहे. उत्तर भारत तापला असला तरी येत्या आठवड्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील तापमान 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्‍यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. गुजरात-राजस्थान सीमेवरील दिसा येथे 43.4 डिग्री सेल्सिअस, तर अहमदाबादला 42.8 डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. आयएमडीने प्रसिद्धीस दिलेल्या प्रेसनोटमधील उल्लेखानुसार, जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, पश्‍चिम राजस्थान, हरियाना, चंदीगड, दिल्ली येथे पाच डिग्री सेल्सिअस; तर पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण उत्तर प्रदेश, पश्‍चिम विदर्भ, उत्तर ओरिसा, न्यू दिल्लीत सात डिग्री सेल्सिअस तापमान वाढले. 

 

हिट ऍक्‍शन प्लॅन 
हवामान खात्याने वर्तविलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र सरकारने हिट ऍक्‍शन प्लॅनअंतर्गत 22 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. गेल्या आठवड्यात या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. यामध्ये विदर्भातील 11, मराठवाड्यातील आठ, नाशिक विभागातील दोन, पुणे विभागातील एका जिल्ह्याचा समावेश आहे. हिट ऍक्‍शन प्लॅनचा हेतू हा, की उष्माघातामुळे होणारे मृत्यू रोखणे. उष्माघात झालेल्या व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू करणे. अन्य सेवा देणे. सर्व जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांत सर्व उपचार उपलब्ध करणे. ऍक्‍शन प्लॅननुसार या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. विविध सरकारी कार्यालये, रुग्णालयांत बेड आरक्षित करणे, विविध उपकरणांनी वॉर्ड सुसज्ज करणे आदींसाठी समन्वयक म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. हेल्पलाईन सुरू करणे. शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे. संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आदींचाही यामध्ये समावेश आहे. 

Web Title: Delivery temperature increase of radiation directly on the ground