भ्रमात राहणारे सरकार सत्तेबाहेर  - विजय नाईक

भ्रमात राहणारे सरकार सत्तेबाहेर  - विजय नाईक

कोल्हापूर - ""केंद्रात जनता सरकारपासून इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांची सत्ता आली आणि गेली; मात्र एखादे सरकार कायमचे राहिले असे कधीही घडले नाही. तशी दर्पोक्ती करणाऱ्यांना सुजाण मतदारांनी सत्तेतून उचलून फेकून दिले,'' अशा शब्दांत "सकाळ'चे सल्लागार संपादक, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी आज देशाच्या भविष्याच्या राजकारणातील दिशा स्पष्ट केली. 

पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्‍लबच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे वितरण श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. विजय पाटील, कॅमेरामन सुनील काटकर, छायाचित्रकार पांडुरंग पाटील यांना यंदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जाहिरात क्षेत्रातील कार्याबद्दल राजाराम शिंदे यांचाही गौरव झाला. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. महापौर हसीना फरास, प्रेस क्‍लबचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव बाबूराव रानगे, प्रताप नाईक आदी उपस्थित होते. अध्यक्ष पाटील यांनी प्रेस क्‍लबच्या कामाचा आढावा घेतला. ज्येष्ठ पत्रकार विजय जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. 

श्री. नाईक यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार अशा तीन टप्प्यांतील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत कशी आहे यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ""केंद्रात जनता सरकार सत्तेत आले त्यावेळी पुढे तीस वर्षे हे सरकार हलणार नाही, असे सांगितले जात होते. संसदीय राजकारणात मतदार हा सुजाण आहे. काहीही झाले तरी आपण कायम राहणार असे ज्यांना ज्यांना वाटले त्यांना उचलून फेकून देण्याचे काम मतदारांनी केले. यशवंतरावांच्या काळात कॉंग्रेसचा सुवर्णकाळ होता. पंडित नेहरूंनी राजकारणात ढवळाढवळ केली नाही. इंदिरा गांधी यांचे नेतृत्व लखलखीत होते. अलीकडे संसदेत पूर्वीसारखे वातावरण दिसत नाही. भांडणाशिवाय काही घडत नाही. सध्या केंद्रासह अकरा ते बारा राज्यांत भाजपची सत्ता आहे. पाच राज्यांत कॉंग्रेस आहे. भाजप हा काही देशव्यापी पक्ष नाही. कॉंग्रेसची ऐतिहासिक पडझड होत आहे. त्यातून हा पक्ष कसा सावरणार, हा चिंतेचा विषय आहे.'' 

सध्या संमिश्र सरकारचा जमाना असल्याचे सांगून श्री. नाईक म्हणाले, ""नरेंद्र मोदी यांना शिवसेनाही हवी आहे आणि आठवलेही. नोटाबंदीमुळे लोकांची पंचाईत झाली; मात्र हे काहीही बोलायला तयार नाहीत. राज्यसभेत बहुमत नाही तर ही परिस्थिती. बहुमत मिळाल्यास काही खरे नाही. पत्रकारांशी ते बोलत नाहीत. राजीव गांधी यांच्यामुळे संगणक क्रांती झाली. त्यांचा उपयोग मनमोहन सिंग यांनी केला नाही; मात्र पंतप्रधान मोदी त्याचा खुबीने वापर करत आहेत. मोदींनी 25 हून अधिक देशांना भेट दिली आहे. त्यांचे परराष्ट्र धोरण चांगले आहे; मात्र तरीही पाकिस्तान काही सुधारेल असे वाटत नाही.'' 

ते म्हणाले, ""सकाळ'चे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर यांची पत्रकारिता वाचकाभिमुख होती. माधव गडकरी, अरुण शौरी, कुलदीप नायर, खुशवंतसिंह यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रकारिता ही धारदार हत्यारासारखी होती. यापुढील काळात पत्रकारांनी राजकीय नेत्यांच्या फार जवळ न जाता दुवा साधण्याचे काम करावे.'' 

"...म्हणून महाराष्ट्राचा पंतप्रधान नाही' 
नाईक म्हणाले, ""केंद्रात पूर्वी यशवंतरावांनी महत्त्वाची चार खाती सांभाळली. वसंतदादा दिल्लीत लोकप्रिय नेते होते. त्यामागे त्यांना असलेला जनाधार महत्त्वाचा होता. शरद पवार यांचे सर्व पक्षांशी असलेले संबंध ही जमेची बाजू आहे. त्यांनी नेहमी बेरजेचे राजकारण केले. महाराष्ट्रात प्रगल्भ नेतृत्व असताना गेल्या सत्तर वर्षांत येथील नेता पंतप्रधान होऊ शकला नाही, ही खंत आहेच. दिल्लीने ब्रिटिशांची "तोडा आणि फोडा' नीती अवलंबून मराठी नेत्यास पंतप्रधान होऊ दिले नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com