श्री विठ्ठल दर्शन कालावधी वाढवण्याची भाविकांमधून मागणी

vitthal rukmini
vitthal rukmini

पंढरपूर: उकाडा कमालीचा वाढलेला असताना देखील अधिक महिन्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत आहेत. परंतु, श्री विठ्ठलाच्या नित्यउपचारासाठी सुमारे चार तास आणि रात्री दोन तास असे सहा तास दर्शन रांग थांबवली जात असल्याने अबालवृध्द भाविकांना तासन्‌तास रांगेत तिष्ठत थांबावे लागत आहे. कडक उन्हामुळे भाविकांना चक्कर येऊन त्रास होण्याच्या घटना सतत घडत आहेत. अशा परिस्थितीत प्रथा, परंपरांचे अवडंबर न करता जास्तीतजास्त भाविकांना सुलभतेने दर्शन होण्यासाठी नित्योपचाराच्या वेळेत एक तास कपात करावी तसेच मंदिर रात्री दोन ऐवजी एकच तास बंद करावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या वेळी लाखोंच्या संख्येने वारकरी येतात. त्यावेळी जास्तीतजास्त भाविकांना श्री विठ्ठल रुक्‍मिणीचे मंदिरात जाऊन दर्शन घेता यावे यासाठी विठूरायाचा आणि रुक्‍मिणीमातेचा पलंग काढून ठेवला जातो. त्या काळात पोषाख, धुपारती, शेजारती आदी नित्योपचार देखील बंद केले जातात. त्यामुळे दर्शनाची रांग कायम चालू रहाते. गेल्या काही वर्षात चैत्री व माघी यात्रेच्या वेळी देखील लाखोंच्या संख्येने वारकरी येऊ लागले आहेत. सध्या कडक उन पडत असताना देखील अधिक महिन्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना चार ते सात तास रांगेत थांबावे लागत आहे. रात्रीच्या वेळी अबालवृध्द तसेच महिलांना दर्शन रांगेतच पाठ टेकावी लागत आहे. त्यातच अनेक वेळा तथाकथित व्हीआयपी लोक दर्शनाला आल्याने पुन्हा त्यांच्यामुळे रांगेतील भाविकांना जादा वेळ थांबावे लागत असल्याने मंदिर समितीने दर्शन रांग बंद ठेवण्याचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्याची मागणी भाविकांमधून होत आहे. दर्शनाचा कालावधी दोन तासानी जरी वाढला तरी मिनिटाला तीस या हिशोबाने दोन तासात सुमारे साडे तीन हजाराहून अधिक जादा भाविकांना दर्शनाचा लाभ मिळेल.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवाच्या नित्योपचारात कपात करुन हा वेळ एक तासाने कमी करता येणे शक्‍य आहे का तसेच रात्री दोन ते चार असे दोन तास मंदिर बंद न ठेवता एकच तास बंद ठेवून लगेच दर्शन सुरु करता येईल का याचा विचार होण्याची गरज आहे. काही वर्षापूर्वी तुकाराम मुंढे हे जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे सभापती असताना त्यांनीजास्ती भाविकांना दर्शन व्हावे यासाठी प्रथा दूर सारुन देवाचा पलंग काढून मंदिर अहोरात्र सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यावेळी वारकरी प्रतिनिधी तसेच प्रमुख वारकरी संघटनांशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतला गेल्याने त्यांच्या निर्णयाला विरोध झाला होता.

सध्या दर्शन रांग या वेळात थांबवली जाते...
नित्यपूजा पहाटे चार ते पाच, महानैवेद्य सकाळी पावणे अकरा ते अकरा, पोषाख व चंदनउटी पूजा दुपारी साडे चार ते साडे पाच, धुपारती सायंकाळी साडे सहा ते सव्वा सात, शेजारती रात्री एक ते दोन अशा वेळी दर्शनाची रांग थांबवली जाते. त्याशिवाय रात्री दोन ते चार या वेळात मंदिर बंद केल्याने दर्शन रांग थांबते. याचा विचार केला असता चोवीस तासातील सुमारे सहा तास दर्शन रांग थांबवली जाते. काही वेळा त्याही पेक्षा जास्त वेळ रांग थांबलेली असते. त्यामुळे पोलिस बंदोबस्तासह प्रशासनावर ताण वाढत आहे.

देवाचे नित्योपचार बंद न करता रात्री दोन तासा ऐवजी एक तास मंदिर बंद करता येईल का? या विषयी वारकरी फडकरी पाईक संघासह सर्व ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करुन समन्वयाने निर्णय घेता येऊ शकेल. भाविकांची सोय आणि धर्म शास्त्र या दोन्हीचा विचार करुन सहमतीने दर्शनाचा वेळ वाढवता येऊ शकेल.
- भागवताचार्य वा. ना. उत्पात व राणा महाराज वासकर, अध्यक्ष, वारकरी पाईक संघटना, पंढरपूर

भाविकांना सुलभतेने दर्शन होण्यासाठी वारकरी संघटनांचे पदाधिकारी व ज्येष्ठ मंडळींशी विचारविनिमय करुन सर्व सहमतीने दर्शनाची वेळ वाढवण्याच्या मागणीचा निश्‍चित विचार केला जाईल. लवकरच या संदर्भात समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले व अन्य मंडळींशी चर्चा करुन निर्णय घेऊ.
- गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com