पुसेगावच्या यात्रेला नोटाबंदीची झळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नोटाबंदीमुळे भाविकांची संख्या कमी नाही, पण रथावरील रक्कम थोडी कमी झाली आहे.

सातारा - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर यंदा नोटाबंदीमुळे नोटांच्या माळा अर्पण करण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.

रथयात्रेचा बुधवारी मुख्य दिवस होता. या रथावर भाविक नोटांच्या माळा अर्पण करतात. या रकमेत दरवर्षी वाढ होत असते. यावर्षी मात्र नोटाबंदीमुळे रकमेची संख्या कमी झाली आहे.
 गतवर्षीची रक्कम 55 लाख 93 हजार 567 रुपये इतकी होती. यंदा मात्री, यामध्ये घट होऊन ती 50 लाख 79 हजार 251 रुपये रथावर जमा झाले आहेत. नोटाबंदीमुळे भाविकांची संख्या कमी नाही, पण रथावरील रक्कम थोडी कमी झाली आहे.

बुधवारी पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधिवत पूजा व अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या पादुका व प्रतिमांची मठाधिपती सुंदरगिरी महाराज, डॉ. जाधव व सर्व विश्वस्तांमार्फत रथात प्रतिष्ठापना केली. थंडीचे प्रमाण कमी असल्याने भाविकांचा रथ व समाधी दर्शनासाठी ओघ वाढला होता. मंत्री महादेव जानकर, डॉ. राजेंद्रसिह राणा, शशिकांत शिंदे, मोहनराव कदम यांनी वेळेत उपस्थित राहून पूजन केले.