डेंगीच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणा सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

सातारा - पुण्यासह लोणंदमध्येही डेंगीचे रुग्ण आढळत आहेत, तर या ना त्या निमित्ताने सातारकरांची पुण्यात ये- जा असते, तसेच साताऱ्यातही काही रुग्ण डेंगीवर उपचार घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने डास प्रतिबंधक पंधरवडा जाहीर केला असून, या कालावधीत शहरात प्रतिबंधात्मक उपाय योजून धूर फवारणी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

याबाबतची माहिती पालिकेचे आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांनी दिली. ते म्हणाले, ""राज्यात अनेक ठिकाणी डेंगी, चिकुनगुण्या व साथ रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. परगावहून येणारे नागरिक अथवा येथून बाहेर गेल्यावर इतर शहरात काही दिवस निवास करून परत येणाऱ्यांमुळे सातारा शहरात या साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शिक्षण, नोकरी- व्यवसाय, नातेसंबंध, व्यापार आदी कारणांमुळे सातारा आणि पुण्याचे जवळचे नाते आहे. काही लोक पुण्यात राहून उपचारासाठी आपल्या मूळ गावी, साताऱ्यात येत आहेत. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.'' 

मोहिमेत शहराच्या अंतर्गत सर्व भागांत धूर फवारणी, कचऱ्यावर डास प्रतिबंधक औषध फवारणी, पाणी साचणारी डबकी- हौद येथे ऑइल टाकणे, गप्पी मासे सोडणे यांसारख्या उपाययोजना प्रामुख्याने करण्यात येणार आहेत. सोशल मीडिया, फ्लेक्‍स, माहिती पत्रके आदींद्वारे साथरोगांसंदर्भात विशेष काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे श्री. झुटिंग यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच साथीसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.